गुरुजींना पाच विद्यार्थ्यांचे ‘टार्गेट’
By Admin | Updated: June 4, 2015 00:01 IST2015-06-03T23:30:41+5:302015-06-04T00:01:12+5:30
महापालिका शाळांची स्थिती : यंदा १८७० विद्यार्थी वाढवण्याचे उद्दीष्ट

गुरुजींना पाच विद्यार्थ्यांचे ‘टार्गेट’
संतोष पाटील - कोल्हापूर -शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या झपाट्याने रोडावत आहे. ५९ पैकी मोजक्या चार ते पाच शाळा सोडल्यास चाळीसहून अधिक शाळांत विद्यार्थ्यांची संख्या तीन अंकीही नाही. त्यामुळे शाळेतील पटसंख्या वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक शिक्षकाने पहिलीसाठी किमान पाच विद्यार्थी आणावेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
६ जूनपासून घरोघरी महापालिकेच्या शाळांचे मार्केटिंग केले जाणार आहे. त्यातून शिक्षण मंडळाने १८७० विद्यार्थीसंख्या वाढीचे उद्दिष्ट आखले आहे.
महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारमय, असाच सर्वसामान्य जनतेचा ग्रह झाला आहे. त्याच मानसिकतेमुळे गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या चार वर्षांत अकराहून अधिक शाळा बंद पडल्या आहेत. हा समज पुसून टाकण्यासाठी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने कात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्षात नवनवीन उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच विद्यार्थीसंख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
खासगी शाळांचे जसे प्रस्थ वाढत गेले तसे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थीसंख्येला गळती लागली, ती आजतागायत सुरूच आहे. गेल्या दोन वर्षांत २९४ विद्यार्थी कमी झाले. ५९ शाळांत फक्त ९५९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विद्यार्थी गळती का झाली याचा शोध घेण्यापेक्षा ठोस कृती आराखडा तयार करून पटसंख्या वाढविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासाठी मंगळवारी महापालिका शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक शिक्षकाने किमान पाच नवीन विद्यार्थी आणावेत, अशी सूचना उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी केली. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत ३७४ शिक्षकांकडून तब्बल १८७० विद्यार्थीसंख्या वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
व्यक्तिमत्त्व विकासावर अधिक भर देण्याचा निर्धार करत विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षांसाठी खास मार्गदर्शन वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्याची सर्व माहिती गुरुजी शहरातील घराघरांत जाऊन देणार आहेत. यासाठी शनिवार, ६ जूनपासून मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढवायचीच, या निर्धाराने सर्व शिक्षक कामाला लागणार आहेत.
महापालिकेच्या शाळा- ७५
सुरू असलेल्या शाळा- ५९
विद्यार्थ्यांची संख्या- ९५९७
शिक्षक संख्या- ३७४
प्रत्येकी पाचप्रमाणे १८७० विद्यार्थी संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट