पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कारखाना सुरू
By Admin | Updated: November 29, 2015 01:07 IST2015-11-29T01:07:13+5:302015-11-29T01:07:13+5:30
संघर्ष टळला : सहायक कामगार आयुक्तांची मध्यस्थी

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कारखाना सुरू
इचलकरंजी : कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एस. एम. हॅमरले या कारखान्यातील व्यवस्थापन व कामगारांचा संघर्ष सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या मध्यस्थीने संपुष्टात आला. बोनस प्रश्नावरून हा संघर्ष उफाळला होता.
याबाबत समजलेली माहिती अशी, एस. एम. हॅमरले कारखान्याकडे ४८५ कामगार असून, दीपावली सणासाठी कामगारांना गतवर्षीप्रमाणे १३,५०० रुपये बोनस मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, यंदा व्यावसायिक मंदीमुळे कारखाना नुकसानीत असल्याने प्रत्येकी ३५०० रुपये बोनस देऊ, अशी भूमिका व्यवस्थापनाची होती. दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने संघर्ष निर्माण झाला होता. कामगारांनी ‘गो स्लो’ आंदोलन करीत कारखान्याचे उत्पादन घटविले.
कामगारांबरोबर वाद वाढत गेल्याने व्यवस्थापनाने कारखाना ‘आजारी’ म्हणून घोषित केला आणि औद्योगिक न्यायालयाकडून ‘लॉक आऊट’ची परवानगी घेतली. कारखाना बंद होत असल्याने कमगारांत खळबळ उडाली.
शुक्रवारी (दि. २७) कामगार मोठ्या संख्येने कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जमले. संतप्त कामगारांनी लॉक आऊटच्या विरोधात घोेषणाबाजी केली. अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला.
अशा मोठ्या तणावाच्या वातावरणात सहायक कामगार आयुक्त गुरव, सरकारी कामगार अधिकारी डी. डी. पवार यांनी कारखान्याचे प्रमुख व्यवस्थापक संजीव सिन्हा, मानव संशोधन व्यवस्थापन पी. एम. काळे आणि कामगारांमध्ये मध्यस्थी केली. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत बैठक चालली. स्थगित झालेली बैठक शनिवारी पुढे घेतली. (प्रतिनिधी)