पाच दुकाने फोडली

By Admin | Updated: July 3, 2016 01:01 IST2016-07-03T01:01:24+5:302016-07-03T01:01:24+5:30

लाखाचा ऐवज लंपास : लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर चोरट्यांचा धुमाकूळ

The five shops were broken | पाच दुकाने फोडली

पाच दुकाने फोडली

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोरील परमपूज्य शिवरामपंत वाडकर महाराजांच्या समाधिमंदिरासह पाच बंद दुकाने फोडून चोरट्यांनी लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. हाकेच्या अंतरावरील दुकाने फोडल्याने लक्ष्मीपुरी पोलिस खडबडून जागे झाले. रात्रगस्तीवेळी पोलिस झोपा काढतात, हे या घरफोड्यांवरून पुढे आले आहे. पोलिस ठाण्यासमोरही घरफोड्या करण्याचे धाडस चोरटे करू लागल्याने व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर परमपूज्य शिवरामपंत वाडकर महाराजांचे समाधिस्थान आहे. याठिकाणी सुरेखा वसंतराव रुकडे (वय ५६, रा. बिरंजे पाणंद, कसबा बावडा) व त्यांचा भाचा विशाल विजयकुमार रुकडे हे नेहमी दिवाबत्ती लावत असतात. शुक्रवारी रात्री ते समाधिस्थळावर दिवाबत्ती लावून दरवाजा बंद करून घरी निघून गेले. शनिवारी आले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आतमध्ये पाहिले असता चांदीच्या वाट्या, ग्लास, दोन निरांजने असा दहा हजार रुपयांच्या किमतीच्या वस्तूंची चोरी झाल्याचे दिसले. त्यांच्या घरफोडीची चर्चा सुरू असतानाच लागोपाठ आणखी चार दुकाने चोरट्यांनी फोडल्याचे दिसून आले. लक्ष्मीपुरी परिसरात सुमित बेंद्रे यांचे देशी दारू विक्रीचे दुकान आहे. त्याचे कुलूप तोडून रोख पाच हजार व मोबाईल लंपास केला. तेथून पुढे चोरट्यांनी सागर देसाई (२६, रा. मरगाई गल्ली) यांच्या स्वामी आॅनलाईन लॉटरी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून कॅश काउंटरमधील एक हजार रुपये व भिंतीवरील घड्याळ चोरून नेले. दीपक दिलीप ओसवाल यांचे के. डी. ओसवाल नावाचे लोखंडी पत्रे विक्रीचे दुकान आहे. त्यांनी गोडावूनमध्ये मोपेडच्या डिक्कीत ठेवलेले बाराशे रुपये, पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल व कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेली. समाधिमंदिरासह दुकानांची कुलुपे तोडून चोरट्यांनी चोऱ्या केल्या. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घरफोड्या झाल्याचे समजताच शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बारडवर संशय
पोलिस रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्या उत्तम राजाराम बारड (वय २२, रा. धामोड, ता. राधानगरी) हा सध्या जामिनावर बाहेर आहे. यापूर्वी त्याने अशाच घरफोड्या केल्या आहेत. बंद दुकाने फोडण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. पोलिसांचे एक विशेष पथक त्याच्या नेहमीच्या अड्ड्यांवर शोध घेत आहे. त्यानेच या घरफोड्या केल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रात्रगस्तीचे पोलिस
होते कोठ ?
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोरच ह्या घरफोड्या झाल्या आहेत. शुक्रवारी रात्रगस्तीवरील पोलिस नेमके होते कोठे ? पोलिस ठाण्याच्या दारात उभे राहिल्यानंतर ही दुकाने दिसतात. अशावेळी चोरटा या पोलिसांच्या निदर्शनास आला कसा नाही ? रात्रगस्तीचे पोलिस झोपल्यानंतर चोरट्याने संधी साधली आहे.
चोरट्याचे फुटेज
व्यापारी दीपक ओसवाल यांच्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्याचे फुटेज तपासले असता एक अनोळखी व्यक्ती संशयितरीत्या फिरताना दिसत आहे. त्याचा शोध गुन्हे शाखेचे पथक घेत आहे.

Web Title: The five shops were broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.