कार झाडावर आदळून पाच ठार
By Admin | Updated: June 5, 2016 01:16 IST2016-06-05T01:16:30+5:302016-06-05T01:16:30+5:30
आंब्याजवळ दुर्घटना : मृत पुण्याचे एकाच कुटुंबातील

कार झाडावर आदळून पाच ठार
आंबा : विशाळगड येथील मलिक रेहान बाबांच्या दर्शनास निघालेल्या पुण्यातील एका कुटुंबीयांच्या कारला तळवडे (ता. शाहूवाडी) येथील अपघाती वळणावर भीषण अपघात होऊन त्यामध्ये पाचजण ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला.
कारचालक इम्रान शरीफ शेख (वय ३८), पत्नी शिफा (३५), वडील शरीफ करीम शेख (७०), आई सलमा (६०) व पुतणी लिबा समीर शेख (९) (सर्व रा. ३२ , घोरपडी, स्वारगेटजवळ, पुणे) अशी मृतांची नावे आहेत.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पुण्यातील घोरपडी येथे राहाणारे शरीफ शेख हे आपली तीन मुले व जावई यांच्या कुटुंबासह सकाळी पुणे येथून सकाळी आठच्या सुमारास चार वेगवेगळ्या वाहनांमधून विशाळगड दर्शनास बाहेर पडले . वारणानगर येथे जेवण करून शेख कुटुंबीय आंबामार्गे विशाळगडकडे निघाले. इम्रान कार (एम. एच.१२ एच. झेड-९८६२) चालवत होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांची कार तळवडे येथील अपघाती वळणावर आली असता त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने ती भरधाव वेगात रस्त्याच्या डाव्या बाजूवरील झाडाला जावून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, गाडीचे इंजिन तुटून चालकाच्या सीटला टेकले.मागील सीटही मोडून पडली. कारमधील चौघाही जणांच्या डोक्याला गंभीर दुखापती होऊन ते जागीच ठार झाले. अन्य तीन वाहनांतील नातेवाईक पुढे आंब्यातील विशाळगड फाट्यावर चौथ्या वाहनाची वाट पहात होते. मात्र, इम्रान यांच्या कारला महामार्गावर अपघात झाल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना स्थानिक तरुणांच्या मदतीने आंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे एकटा कंपाउंडर हजर होता. उपचार करण्यासाठी डॉक्टर नसल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त करीत जखमी लिबा व सलमा यांना थेट साखरपा आरोग्य केंद्राकडे नेले. छोटी लिबा गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी वाटेतच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, येथील १०८ रुग्णसेवेने मृतांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. डी. बी. जाधव व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
कारचा चक्काचूर
तळवडे वळणावर ठोकरलेली कार प्रथम लोखंडी खांब असलेल्या सूचना फलकावर आदळली. तो खांब उडवून समोरच्या झाडात घुसली. कारचे लाईट पुढे दहा फुटावर फेकले गेले होते. जेवणातील पदार्थ इतरत्र विखुरले होते. त्यावरून अपघात किती भीषण होता, हे स्पष्ठ होते.
कुटुंबावर नियतीचा घाला..
इम्रान याचे आई-वडील, भाऊ, भाऊजी असे चौघाचे कुटुंब मलिक रेहान बाबांच्या दर्शनास निघाले होते. पाच पुरुष त्यांच्या पत्नी व पाच मुले असा एकत्रित परिवार चार वाहनांमधून जात असताना त्यातील एका कारला अपघात होवून पाचजण ठार झल्याने े शेख परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.