इचलकरंजीतील पालनकर ज्वेलर्स दरोडाप्रकरणी पाचजण ताब्यात?
By Admin | Updated: April 10, 2015 00:24 IST2015-04-09T22:32:45+5:302015-04-10T00:24:15+5:30
बंगलोरात कारवाई : पोलिसांचा दुजोरा नाही

इचलकरंजीतील पालनकर ज्वेलर्स दरोडाप्रकरणी पाचजण ताब्यात?
इचलकरंजी : येथील पालनकर ज्वेलर्सवर पडलेल्या दरोडाप्रकरणी पाच संशयितांना बंगलोर येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असून, अद्याप संपूर्ण उलगडा झाला नसल्याचे समजते. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याला दुजोरा मिळाला नाही.येथील भरचौकात असलेल्या पालनकर ज्वेलर्सवर २८ मार्चला दरोडा पडला होता. यामध्ये चोरट्यांनी चौदा किलो सोने व २८५ किलो चांदी व दोन लाख रुपये रोख रक्कम असा सुमारे साडेचार कोटींचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणाचा तपास लागणे पोलिसांसाठी आव्हान असल्याने पोलीस दलामार्फत पथके निर्माण करून तपासकामी विविध दिशेला पाठविली आहेत. कर्नाटक परिसरात गेलेल्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजमधील छायाचित्रावरून व तेथील नेटवर्कचा वापर करीत बेंगलोर येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांकडे तपास सुरू आहे. मात्र, चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवून प्रकरणाचा उलगडा होणे आवश्यक असल्याने गुप्तता पाळली आहे. दरम्यान, पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नसून तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)