स्फोटप्रकरणी पाचजणांवर गुन्हा
By Admin | Updated: December 1, 2014 00:39 IST2014-12-01T00:36:19+5:302014-12-01T00:39:51+5:30
अवैध साठा केल्याचा आरोप : कारखाना शहराबाहेर हलविण्याची मागणी

स्फोटप्रकरणी पाचजणांवर गुन्हा
विटा : येथील तासगाव रस्त्यावर शनिवारी सकाळी १० वाजता ‘बाबालाल फायर वर्क्स’ या फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटप्रकरणी विटा पोलिसांनी कारखान्याचे मालक मुस्ताकहुसेन अहमद मुल्ला, सादीकहुसेन अहमद मुल्ला, बिलाल मुस्ताकहुसेन मुल्ला, साजिद नजीर शिकलगार व कामगार रियाज गुलाब तांबोळी (सर्व रा. विटा) या पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून अवैधरित्या स्फोटक वस्तू, फटाक्यांचा साठा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
विटा येथील नेहरूनगर या भरवस्तीत फटाके तयार करत असताना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात रियाज तांबोळी, बिलाल मुल्ला व साजिद शिकलगार हे तिघेजण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटानंतर तरुणांच्या सतर्कतेने कारखान्यातील सुमारे दोन ते तीन ट्रक फॅन्सी फटाक्यांचा साठा बाहेर काढण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.
येथील बाबालाल फायर वर्क्सचे मालक मुस्ताकहुसेन मुल्ला यांचा कारखाना भरवस्तीत आहे. त्यातच या कारखान्यात शोभेची दारू निर्मिती करण्याचे काम केले जाते. शनिवारीही दारू निर्मिती करतानाच हा स्फोट झाल्याचे घटनास्थळी नागरिकांनी सांगितले. त्यामुळे विटेकर नागरिक आज रविवारी भीतीच्या छायेत वावरत असल्याचे निदर्शनास आले.
त्यावेळी नागरी वस्तीत स्फोटक वस्तू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून जादा फटाक्यांचा साठा व निर्मिती केल्याप्रकरणी मुस्ताकहुसेन मुल्ला, सादीकहुसेन मुल्ला, बिलाल मुस्ताकहुसेन मुल्ला यांच्यासह कारखान्यातील कामगार रियाज तांबोळी व साजिद शिकलगार या पाचजणांविरुध्द शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)