कोल्हापुरात पाच लाखांसाठी तरुणाचे अपहरण
By Admin | Updated: July 5, 2016 00:48 IST2016-07-05T00:45:00+5:302016-07-05T00:48:01+5:30
पाचजणांचे कृत्य : मोबाईल लोकेशनवरून तीन तासांत सुटका; शाहूपुरी पोलिसांची कामगिरी; सूत्रधारास अटक

कोल्हापुरात पाच लाखांसाठी तरुणाचे अपहरण
कोल्हापूर : चहा पावडर व्यवसायातील पाच लाख रुपयांच्या वसुलीसाठी सोमवारी दुपारी पाचजणांनी स्टार बझार येथून अपहरण केलेल्या तरुणाची अवघ्या तीन तासांत शाहूपुरी पोलिसांनी सुटका केली. सुहास सीताराम मिसाळ (वय ३०, रा. कूर, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार संशयित प्रकाश तुकाराम पाटील (३४, रा. राजारामपुरी १२ वी गल्ली) याला अटक केली. त्याचे अन्य चौघे साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सुहास मिसाळ व संशयित प्रकाश पाटील या दोघांचा भागीदारीमध्ये चहा पावडर, साबण विक्री व्यवसाय आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून ते गावोगावी चहा पावडर, साबणांची विक्री करत असत. या व्यवसायातून सुहास हा प्रकाशचे पाच लाख रुपये देणे होता. त्याच्याकडे वसुलीसाठी वारंवार तगादा लावला होता. सोमवारी दुपारी बारा वाजता सुहास पत्नी शीतल (२९) हिला घेऊन स्टार बझार येथे खरेदीसाठी आला होता. काही वेळाने कारमधून प्रकाश पाटील व अनोळखी चौघे याठिकाणी आले. त्यांनी सुहासला बाहेर बोलावून पैशांची मागणी केली. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. प्रकाश व त्याच्या मित्रांनी सुहासला जबरदस्तीने कारमध्ये बसविले. त्यांना विरोध करण्यासाठी शीतल पुढे सरसावली असता तिला ढकलून दिले. त्यानंतर कारमधून जबरदस्तीने त्याला ते घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या दिशेने निघून गेले. यामुळे घाबरलेल्या शीतलने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेत आपल्या पतीचे अपहरण झाले असून त्यांना ठार मारून नदीत फेकण्याची धमकी प्रकाश पाटील व त्याच्या मित्रांनी दिली असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगले यांना सांगितले. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संशयित पाटील याचे मोबाईल लोकेशन तपासले असता शेंडा पार्क परिसरात असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या एका विशेष पथकाने तत्काळ शेंडा पार्क परिसरात धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच पाटील याचे साथीदार पसार झाले. पोलिसांनी पाटील याला कारसह ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. पतीची सुटका झाल्याचे डोळ्यासमोर पाहताच पत्नी शीतलचा जीव भांड्यात पडला. यावेळी तिने शाहूपुरी पोलिसांचे हात जोडून आभार मानले.
आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याने पोलिसांनी मिसाळ याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रकाश पाटील याचे आपण कसलेही पैसे देणे नाही. तोच माझे ३८ हजार रुपये देणे लागतो; परंतु दमदाटी व दहशतीच्या जोरावर तो माझ्याकडे पाच लाखांच्या वसुलीसाठी मागे लागला असल्याचे सांगितले. पोलिसांनी शीतल मिसाळ हिच्या फिर्यादीनुसार संशयित प्रकाश पाटील याच्यावर अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
कारमध्ये मारहाण
सुहास मिसाळ याचे अपहरण केल्यानंतर त्याला कारमधून शिवाजी विद्यापीठ, सायबर कॉलेज, शिवाजी चौक, मध्यवर्ती बसस्थानक, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, संभाजीनगर ते शेंडा पार्क आदी ठिकाणी फिरविण्यात आले. यावेळी कारमध्ये त्याला बेदम मारहाण केली. ‘पैसे दे, नाही तर तुला आज सोडत नाही,’ अशी धमकी पाटील व त्याचे साथीदार देत होते.