‘गोकुळ’च्या पाच कर्मचाऱ्यांचे राजीनाम
By Admin | Updated: December 10, 2014 00:30 IST2014-12-10T00:27:30+5:302014-12-10T00:30:30+5:30
महादेवराव महाडिक यांचा दणका : मुंबईतील दूध चोरीप्रकरण भोवले; ठेका रद्द करण्याच्या निर्णयास स्थगितीे

‘गोकुळ’च्या पाच कर्मचाऱ्यांचे राजीनाम
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघातील (गोकुळ) मुंबईत दूध गैरव्यवहारप्रकरणी संघाने आज पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी थेट नोकरीचे राजीनामेच घेतले. आमदार महादेवराव महाडिक यांनीच संबंधित कर्मचाऱ्यांना स्वत:हून राजीनामे लिहून देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत.
मुंबईतील संघाचा ढमाल नावाचा वितरक (मूळचा कराड येथील) महिन्यापूर्वी संघाच्या वाशी शीतकरण केंद्रातून म्हशीच्या दुधाच्या पॅकिंग केलेल्या पिशव्या नेत होता परंतु पैसे भरताना मात्र तो गायीच्या दुधाचे भरत होता. ढमाल हा संघाचा १९९१-९२ पासून वितरक आहे. त्याने पोटएजन्सी नेमली होती. पोटएजन्सीच्या व्यक्तीकडून ही चोरी सुरू होती. दिवाळीच्या काळात दुधास प्रचंड मागणी होती. त्यावेळी मुंबईतून दिवसाला साडेसात लाख लिटर दूध विक्री होत होती. त्यामुळे या काळात बाहेर जाणाऱ्या ठराविकच गाड्या तपासल्या जात होत्या. त्यातील त्रुटींचा आधार घेत टोन्ड दुधाच्या गेटपासवर म्हशीचे दूध नेण्याचा हा प्रकार तीन ते चार दिवस सुरू होता. ही गोष्ट संघाच्याच यंत्रणेच्या निदर्शनास आल्यावर त्याबद्दल व्यवस्थापनाकडे तक्रार झाली. त्याची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली.
१८२० लिटर दूध त्याने फसवणूक करून नेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याकडून २ लाख ७० हजार रुपये दंड भरून त्याचा ठेका रद्द करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता परंतु या प्रकरणाला संघातील अंतर्गत राजकारणातून नव्याने तोंड फुटले. हा रद्द करण्यात आलेला ठेका मिळावा यासाठीही काहीजणांचे प्रयत्न आहेत. तोदेखील पदर या घडामोडींमागे आहे. संघाने केलेल्या चौकशीत संघाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे संशयाची सूई वळल्याने पाच कर्मचाऱ्यांना आज राजीनामे देण्याचे आदेश देण्यात आले. त्यांनी स्वत:हून राजीनाने द्यावेत, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
टोन्ड दुधाच्या गेटपासवर म्हशीचे दूध नेण्याच्या तक्रारीत तथ्य आहे. त्यामध्ये अद्याप कुणावर कारवाई केली नसली तरी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. संघाने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे.
- डी. व्ही. घाणेकर,
व्यवस्थापकीय संचालक गोकुळ दूध संघ
दरम्यान, आजच संबंधित वितरकाने ठेका रद्द करण्याच्या निर्णयास स्थगिती आणली आहे.