कात्यायनी मंदिरासाठी सव्वा कोटीचा निधी

By Admin | Updated: September 1, 2014 00:30 IST2014-09-01T00:09:57+5:302014-09-01T00:30:08+5:30

मधुकर जांभळे : दोन कोटी चौदा लाख निधी मागणीचा प्रस्ताव होता

Five crore funds for the temple of Katyayani | कात्यायनी मंदिरासाठी सव्वा कोटीचा निधी

कात्यायनी मंदिरासाठी सव्वा कोटीचा निधी

कोल्हापूर : कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र कात्यायनी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून एक कोटी २० लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती करवीर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष मधुकर जांभळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. बालिंगे (ता. करवीर)चे ग्रामदैवत ‘कात्यायनी’ हे ऐतिहासिक मंदिर आहे. प्रत्येक पौर्णिमा, अमावस्येला देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते. विजया दशमी दसऱ्याला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह कर्नाटकातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. गुरुपौर्णिमेला येथे मोठ्या प्रमाणात दीपोत्सव असतो. राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराचा ‘क’ वर्ग पर्यटनस्थळात समावेश होता; पण तीन महिन्यांपूर्वी या मंदिराला ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळास मान्यता मिळाली. त्यानंतर या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी चौदा लाखांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. गेले अडीच-तीन महिने निधी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे जांभळे यांनी पत्रकात म्हटले आहे. सुशोभीकरणासाठी मंजूर झालेल्या निधीचे पत्र गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज, रविवारी बालिंगे ग्रामस्थांना दिले. यावेळी कात्यायनी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष वसंतराव जांभळे, शरद मुनीश्वर, कात्यायनीचे पुजारी विष्णुपंत गुरव व राजू गुरव, प्रशांत पत्की, नेमिनाथ पाटील, दीपक जांभळे, संतोष जांभळे, रघुनाथ जांभळे, कपिल जांभळे, आदी उपस्थित होते.

निधी असा खर्च केला जाईल.
महिला भक्तनिवास - २४ लाख ६८ हजार
शौचालय (पुरुष) - १४ लाख ९९ हजार
शौचालय (महिला) - १४ लाख ९९ हजार
पालखी रस्ता - २४ लाख ९९ हजार
संरक्षक भिंत - २४ लाख ८९ हजार
मंदिर परिसरास दगडी फरशी - १४ लाख ९९ हजार

Web Title: Five crore funds for the temple of Katyayani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.