भाचरवाडीत गोळीबार; एक ठार
By Admin | Updated: June 14, 2014 01:25 IST2014-06-14T01:25:12+5:302014-06-14T01:25:32+5:30
एकतर्फी प्रेमातून कृत्य : मृत कोलोलीचा; संशयित पसार

भाचरवाडीत गोळीबार; एक ठार
कोल्हापूर/कोतोली : एकतर्फी प्रेमाच्या सुडातून भाचरवाडी (ता. पन्हाळा) येथे बंदुकीतून गोळीबार झाल्याची घटना आज, शुक्रवारी सायंकाळी घडली. या गोळीबारात सूर्यदीप ऊर्फ दादासो राजाराम पाटील (वय २२, रा. कोलोली, ता. पन्हाळा) हा तरुण ठार झाला. हा गोळीबार संशयित पोपट श्रीपती गायकवाड (४४, रा. भाचरवाडी) याने केला असल्याचा आरोप नातेवाइकांनी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय येथे केला. गायकवाड हा विवाहित असून त्याला मुले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, भाचरवाडी येथील रामचंद्र जाधव यांच्या मुलीचा कोलोलीतील सूर्यदीप राजाराम पाटील याच्याबरोबर गतवर्षी विवाह झाला होता. मात्र, या मुलीवर संशयित पोपट गायकवाड हा एकतर्फी प्रेम करीत होता. पहिला विवाह होऊनही त्या मुलीच्या घरच्यांकडे तो लग्नाची मागणी घालत होता. मात्र, तिच्या घरच्यांचा या लग्नाला नकार होता. त्यातून वर्षापूर्वी सूर्यदीप पाटील याच्याबरोबर त्या मुलीचा विवाह झाला. ती आता पाच महिन्यांची गर्भवती आहे. काल, गुरुवारी सूर्यदीप पाटील याने आपल्या पत्नीला भाचरवाडी येथे माहेरी पाठविले होते. आज, शुक्रवारी सायंकाळी तो तिला सासरी नेण्यासाठी आला असता पत्नीची छेडछाड केल्याच्या कारणावरून संशयित पोपट गायकवाडबरोबर सूर्यदीपचा वाद झाला. या वादातून गायकवाडने रागाच्या भरात बंदुकीतून सूर्यदीपवर गोळीबार केला. यावेळी अडविण्यासाठी गेलेल्या सूर्यदीपचा मेहुणा अमर जाधव व सासू संगीता जाधव यांना गायकवाडच्या कुटुंबीयांनी धक्काबुक्की केली. गोळीबारानंतर संशयित गायकवाड पसार झाला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या सूर्यदीपला मेहुणा अमर जाधव याने दुचाकीवरून कोतोली (ता. पन्हाळा) येथे आणले. पण, त्याठिकाणी त्याला कोल्हापूरला नेण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध झाले नाही. शेवटी पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती शंकर पाटील यांनी स्वत:च्या चारचाकी वाहनातून सूर्यदीप व अमर जाधव यांना सीपीआरमध्ये आणले. त्यांच्यापाठो-पाठ नातेवाईक व ग्रामस्थ रुग्णालयात आले. तेथे सूर्यदीप पाटील याला उपचारासाठी नेले; पण डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले.सूर्यदीप मृत झाल्याचे समजताच नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडून गोंधळ केला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष्मीपुरी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
सीपीआरमध्ये गर्दी...
सूर्यदीप पाटील याच्या खुनाचे वृत्त समजताच कोलोली व भाचरवाडी येथील त्यांचे नातेवाईक सीपीआर रुग्णालयात आले. त्यांनी एकच हंबरडा फोडला. रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी झाली होती.
संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीचा?
संशयित पोपट गायकवाड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे भाचरवाडीतील ग्रामस्थांनी सीपीआर रुग्णालयात सांगितले.
त्याच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे
दाखल असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.