मासे फेकले ‘प्रदूषण’च्या कार्यालयात
By Admin | Updated: April 8, 2015 00:34 IST2015-04-07T22:55:40+5:302015-04-08T00:34:00+5:30
मानवाधिकार न्याय संघटनेचे आंदोलन : ‘पंचगंगा’ प्रदुषणप्रश्नी राजाराम कारखान्यावर कारवाईची मागणी

मासे फेकले ‘प्रदूषण’च्या कार्यालयात
कोल्हापूर : पंचगंगा नदीतील मृत मासे मंगळवारी मानवाधिकार न्याय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात फेकून निषेध नोंदविला. मासे मृत होण्यास जबाबदार ठरलेल्या राजाराम कारखान्यावर कठोर करवाई करावी, अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या घरी मृत मासे पोहोच करण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.शिये (ता. करवीर) हद्दीत पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे रविवारी (दि. ५) सायंकाळी उघडकीस आले. त्यानंतर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) तक्रार केली. सोमवारी देसाई यांच्यासह एमपीसीबी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कसबा बावड्यातील राजाराम बंधारा ते शिये पुलादरम्यान नदीपात्राची पाहणी केली. त्यावेळी उंबरमळी भागातून राजाराम साखर कारखान्याने मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मंडळाने कारखान्यास नोटीस दिली.
मृत माशांमुळे दुर्गंधी सुटली आहे. ते नदीतून काढण्याकडे ‘प्रदूषण’च्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त मानवाधिकार न्याय संघटनेचे पदाधिकारी पंचगंगा नदीतून मृत मासे पोत्यातून घेऊन आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरडीवर मृत मासे ठेवून जवळच असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे त्यांनी मोर्चा वळविला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी करीत दुपारी दोनच्या सुमारास ते कार्यालयात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात मृत माशांचे दफन करावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी याला विरोध केला. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी प्रदूषणच्या कार्यालयात मृत मासे फेकले. अधिकाऱ्यांच्या अंगावरही मासे फेकण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. परिणामी काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्वरित पोलीस आल्यामुळे तणाव निवळला.
संघटनेचे विशाल टेंबुगडे, विजय जाधव, उदय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
आधिकाऱ्यांना निलंबित करावे
उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीष होळकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, राजाराम कारखान्याने मळीमिश्रित पाणी पंचगंगेत सोडले आहे. हजारो मासे मृत झाले आहेत. कारखान्यांवर कठोर कारवाई करावी. कारखान्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करावे. यावेळी होळकर यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.