मासे घेऊन चाललेला कंटेनर उलटला
By Admin | Updated: November 25, 2014 00:29 IST2014-11-25T00:12:44+5:302014-11-25T00:29:53+5:30
विद्यापीठ चौकात अपघात : ताबा सुटल्याने घटना

मासे घेऊन चाललेला कंटेनर उलटला
कोल्हापूर : रत्नागिरीहून मासे भरून बेळगावला चाललेला कंटेनर शिवाजी विद्यापीठ चौकात येताच चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून रस्त्याकडेला उलटला. कंटेनरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पावलो फ्रान्सिस पिंटो (वय ३७, रा. शिरशी, जि. कारवार, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. मासे भरलेला कंटेनर उलटल्याच्या वृत्ताने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ही घटना आज, सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास
घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, रत्नागिरीहून कोल्हापूरमार्गे बेळगावकडे कंटेनरआठ लाख किमतीचे मासे भरून निघाला होता. तो शिवाजी विद्यापीठ चौकात येताच चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून अचानक उलटला. चालक केबिनमध्ये अडकला होता. स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी धाव घेत केबिनमधून चालकाची सुखरूप सुटका केली. चालक भेदरून गेला होता. कंटेनरमध्ये मासे असल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरली. माशांनी भरलेला कंटेनर उलटल्याचे वृत्त शहरात पसरताच परिसरातील नागरिकांनी विद्यापीठ चौकाकडे धाव घेतली. राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत माहिती घेतली. कंटेनरमध्ये मासे असल्याने नागरिकांच्या गर्दीमुळे लूटमार होण्याची शक्यता ओळखून पोलीस कंटेनर सभोवती थांबून राहिले. आॅईल रस्त्यावर सांडल्याने रस्ता पूर्णत: निसरडा झाला होता. त्यामुळे अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. (प्रतिनिधी)