पदवीचे पहिल्या वर्षीचे प्रवेश रखडणार
By Admin | Updated: June 4, 2015 00:03 IST2015-06-03T21:34:49+5:302015-06-04T00:03:58+5:30
शिवाजी विद्यापीठ : संलग्नीकरण प्रमाणपत्रे महाविद्यालयांना अद्यापही दिलेली नाहीत

पदवीचे पहिल्या वर्षीचे प्रवेश रखडणार
सुहास जाधव -पेठवडगाव -शिवाजी विद्यापीठाने संलग्नीकरण प्रमाणपत्र महाविद्यालयांना अद्यापही दिलेली नाहीत. त्यामुळे महाविद्यालयाच्या माहिती पुस्तकांची अद्यापही छपाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पदवीच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा फटका महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना बसण्याची चिन्हे आहेत.
बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर झाला आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षाची माहिती पुस्तिका घेण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात येत आहेत. या माहिती पुस्तिकेमध्ये विद्यापीठाच्या संबंधित महाविद्यालयास परवानगी दिलेल्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र छापल्याशिवाय ते वितरित करू नये, अशी सूचना शिवाजी विद्यापीठाने दिली आहे.
शिवाजी विद्यापीठाने एखादी सूचना केली की, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही तत्परता दाखविली जात नाही. याकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यंदा विविध अभ्यासक्रमांचे संलग्नीकरण प्रमाणपत्र विद्यापीठाने न दिल्यामुळे महाविद्यालयांनी माहिती पुस्तकांची छपाई केलेली नाही. पदवीची प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी साधारणत: आठ दिवसांचा कालावधी असतो. तर महाविद्यालये १५ जूनला सुरू करावीत, असेही निर्देश विद्यापीठाचे आहेत.
हे संलग्नीकरण प्रमाणपत्र शुक्रवारी (दि. ५ ) मिळणार असल्याचे समजते. त्यानंतर महाविद्यालये अशा प्रमाणपत्रासह माहिती पुस्तिका छपाईला देणार. त्यानंतर माहिती पुस्तिका वितरित होणार. नंतर महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया राबवणार. या साऱ्यात बराच वेळ जाणार असल्याने महाविद्यालये १५ जूनपर्यंत सुरू होतील, याची शक्यता दिसत नाही. याबाबत विद्यापीठाच्या संलग्नीकरण विभागाशी संपर्क साधला असता, सगळ्याच महाविद्यालयांची कामे तत्काळ करण्यासाठी आग्रही असतात. मात्र, आम्हाला इतरही कामे असतात, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाकडून अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे महाविद्यालयांचे माहिती पत्रक, छपाई, विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी, त्यानंतर प्रवेश ही सर्व प्रक्रिया लांबणार आहे.
- भगवान सोनद, सचिव, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटना.
विद्यार्थ्यांच्या माहिती संकलनाचे काम
सध्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती पुस्तके देण्याऐवजी विद्यार्थ्यांचे नाव, मिळालेले गुण, मोबाईल क्रमांक घेऊन पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची प्राथमिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना माहिती पुस्तकाअभावी महाविद्यालयाचे अंतरंग समजू शकत नाहीत. नुसतीच सर्व ठिकाणी चौकशी सुरू असल्याचे दिसून येते.