प्रथम वर्ष प्रवेशाचा गुंता यंदाही कायम
By Admin | Updated: May 30, 2015 00:34 IST2015-05-30T00:05:28+5:302015-05-30T00:34:33+5:30
शासकीय आदेशाचा परिणाम : महाविद्यालयांना शासन निर्णयाची प्रतीक्षा

प्रथम वर्ष प्रवेशाचा गुंता यंदाही कायम
संतोष मिठारी - कोल्हापूर -बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यावर्षी प्रथम वर्षाच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या आणि त्यात भरीस भर असलेले नवीन महाविद्यालय, तुकडी, विषयांना मान्यता न देण्याचा २९ एप्रिल २०१५ पारित झालेला शासन आदेश. या दोन्ही बाबींमुळे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या (एफ. वाय.) प्रवेशाचा गुंता यावर्षी देखील कायम राहणार आहे.
पदवीच्या प्रथम वर्षासाठी बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बी. सी. एस., बी. बी. ए. अशा ११ अभ्यासक्रमांची विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमता ७१ हजार इतकी आहे. गेल्यावर्षी बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढल्याने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २५ हजार विद्यार्थी अतिरिक्त झाले होते. यावेळी शासन नियमांनुसार निश्चित केलेल्या विद्यार्थीसंख्येऐवजी जादा विद्यार्थी प्रवेशित करणाऱ्या महाविद्यालयांना दोनशे पट दंडांची कारवाई करण्यात येणार होती. अशा स्थितीत अतिरिक्त ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी विद्यार्थी संघटना, राजकीय पक्षांनी विद्यापीठाला निवेदने दिली, आंदोलने केली. त्यानंतर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जादा तुकड्या दिल्या. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.५९ टक्क्यांनी बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे प्रथम वर्षाच्या प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची संख्या निश्चितपणे वाढणार आहे. वाढीव तुकड्या मिळाल्याने गेल्यावर्षी अतिरिक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला. मात्र, २९ एप्रिलच्या शासन आदेशाने यावर्षी प्रथम वर्षाचा गुंता वाढणार आहे. या आदेशानुसार नवीन तुकडी देण्यात येणार नाही. या आदेशामुळे बहुतांश महाविद्यालयांनी शासन नियमानुसारच्या क्षमतेइतकेच प्रवेश देण्याचे निश्चित केले आहे. शिवाय प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कसे सामोरे जायचे, असा प्रश्न महाविद्यालयांना पडला आहे. अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत वाढीव तुकडी आणि अन्य बाबींबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निर्णयाची प्रतीक्षा महाविद्यालयांना लागून राहिली आहे.
अतिरिक्त विद्यार्थी सुमारे ३० हजार
गेल्यावर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ९१.५४ टक्के लागला होता. सुमारे २५ हजार अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर्षी विभागाच्या निकालाची टक्केवारी ०.५९ ने वाढली असून, १ लाख १५ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाढलेली संख्या पाहता यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सुमारे ३० हजार विद्यार्थी अतिरिक्त ठरणार असल्याचे दिसून येते. त्यांच्या प्रवेशासाठी वाढीव तुकड्यांना मान्यता देणे आवश्यक ठरणार आहे.