मुलींच्या नावे ठेव ठेवणारे चरण महाराष्ट्रातील पहिले गाव - धैर्यशील माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST2021-08-22T04:28:03+5:302021-08-22T04:28:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील चरण हे गाव मुलींच्या नावे ठेव ठेवणारे पहिले गाव असून, हा आदर्श ...

मुलींच्या नावे ठेव ठेवणारे चरण महाराष्ट्रातील पहिले गाव - धैर्यशील माने
लोकमत न्यूज नेटवर्क
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील चरण हे गाव मुलींच्या नावे ठेव ठेवणारे पहिले गाव असून, हा आदर्श पाहूनच शासनाने मुलींच्या नावे ठेव ठेवणारा उपक्रम राबविला. या गावच्या कन्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य सभापतीपदी विराजमान होते ही एक अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
ते चरण (ता. शाहूवाडी) येथे वंदना अरुण जाधव यांची कोल्हापूर जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापतीपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कारप्रसंगी बोलत होते. माजी आमदार सत्यजित पाटील, माजी सरपंच के. एन. लाड यावेळी प्रमुख उपस्थित होते.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, तत्कालीन सरपंच के. एन. लाड यांनी, मुलगी जमान्माला आल्यानंतर तिच्या नावे ठेव ठेवणे व मुलीच्या लग्नात माहेरची साडी भेट देणे ही महाराष्ट्राला आदर्श घालून देणारी योजना राबवली. असे माहेर लाभलेल्या वंदना जाधव यांचा माहेरचा सत्कार पाहून यातून चरणवासीयांचे भरभरून प्रेम पाहायला मिळाले.
यावेळी वंदना जाधव म्हणाल्या की, राधानगरी तालुक्यातील तळाशी हे सासर व चरण हे माहेर या दोन्ही घराचे नाव उज्वल करेन. तसेच मी ज्या शाळेत शिकले त्या शाळेला सहा लाखांचा निधीही देत आहे.
माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, वंदना जाधव यांना बांधकाम व आरोग्य सभापतिपदी आमचे सहकारी आमदार प्रकाश आबिटकर यांनी संधी देऊन जिल्हा परिषदेमध्ये एका स्त्रीचा सन्मान केला आहे. त्या संधीचे त्या सोने करतील.
यावेळी विजय खोत, दिलीप पाटील, हंबीरराव पाटील, अकांक्षा पाटील, दत्ता पवार, एल. वाय. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
. फोटो - बांधकाम व आरोग्य सभापती यांच्या सत्कारप्रसंगी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सत्यजित पाटील, के. एन. लाड व मान्यवर .