राखीव गटातील निकाल लागणार पहिल्यांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST2021-05-05T04:38:48+5:302021-05-05T04:38:48+5:30

गोकूळचा आज फैसला : अकरापर्यंत समजणार कल, मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध ...

For the first time, the result will be in the reserved group | राखीव गटातील निकाल लागणार पहिल्यांदा

राखीव गटातील निकाल लागणार पहिल्यांदा

गोकूळचा आज फैसला : अकरापर्यंत समजणार कल, मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर वर्चस्व कोणाचे, याचा फैसला आज, मंगळवारी होणार आहे. सकाळी आठपासून कसबा बावडा येथील शासकीय बहूद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरुवात होणार असून सकाळी अकरापर्यंत कल स्पष्ट हाेईल. क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याने अंतिम चित्र दुपारी दोननंतरच स्पष्ट होणार आहे.

सर्वसाधारण गटात १६ जागांसाठी ३३ उमेदवार आहेत. त्यात येथे मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाले. त्यामुळे या गटातील मतमोजणीस वेळ लागणार आहे. त्याउलट राखीव गटातील मतमोजणी गतीने होणार आहे. त्यातही अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय या तीन गटांतील निकाल पहिल्यांदा लागणार आहेत. त्यातून कल समजल्यावर समर्थकांची अनावश्यक गर्दी टाळता येईल, असा त्यामागे निवडणूक विभागाचा होरा आहे. रविवारी दोन्ही आघाड्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत एकगठ्ठा मतदान करून घेतले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इर्षेने मतदान झाले. एकूण ३,६४७ मतांपैकी ३,६३९ मतदान झाले आहे.

गेली दोन महिने ‘गोकूळ’चे रणांगण आरोप-प्रत्यारोपाने गाजत आहे. दूध उत्पादकांना दिलेली वेळेत दूध बिले, वर्षाला रिबेटच्या माध्यमातून दिलेले ९८ कोटींच्या जोरावर आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी रिंगणात उतरली होती तर मल्टिस्टेट, संघातील भ्रष्टाचार व सत्ता दिल्यास दोन रुपये जादा दर देण्याचे अभिवचन, हे मुद्दे घेऊन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने टक्कर दिली. दूध संघाशी संबंधित मुद्द्यांवर निवडणुकीत चर्चा झाली खरी मात्र पालकमंत्री पाटील व महादेवराव महाडिक यांच्यातील टीका-टिप्पणीमुळे निवडणुकीत रंगत आली होती.

अशी होईल प्रक्रिया...

१. बारा तालुक्यातील सर्व मते अगोदर एकत्र केली जातील. त्यानंतर सर्वसाधारण, महिला व राखीव गटातील तीन अशा मतपत्रिकांचे स्वतंत्र प्रत्येकी २५ चे गठ्ठे केले जातील. गठ्ठे करण्यासाठीच किमान ११ वाजतील असा अंदाज आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणीस सुरुवात होईल.

२. मतदारसंघनिहाय मतमोजणी अंतर्गत सर्वसाधारण मतदारसंघ मतमोजणी १८ टेबलांवर होईल. या १८ टेबलांवर प्रत्येकी २५ मतांचे गठ्ठे दिले जातील. २५ मतांची मतमोजणी शीट असेल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका २५ मतांच्या गठ्ठ्यामध्ये एकाच वेळी सर्व १८ टेबलांवर विभागल्या जातील.

३. महिला राखीव मतदारसंघातील मतमोजणी टेबल क्रमांक एक ते नऊवर होईल. या टेबलावर ५० मतांची मतमोजणी शीट असेल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका एकाच वेळी एक ते नऊ या टेबलांवर विभागल्या जातील.

४. इतर मागासवर्गीय मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक दहा ते बारावर होईल. मतदानाच्या सर्व मतपत्रिका या टेबलावर विभागल्या जातील. ५. भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक १ ते १५ वर होईल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका या टेबलावर विभागल्या जातील.

६. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक १६ ते १८ वर होईल.

Web Title: For the first time, the result will be in the reserved group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.