बलात्कारप्रकरणी एकास सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By Admin | Updated: November 16, 2014 00:51 IST2014-11-16T00:34:32+5:302014-11-16T00:51:50+5:30
अवघ्या दहा महिन्यांत खटल्याचा निकाल

बलात्कारप्रकरणी एकास सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
गडहिंग्लज : कचरा टाकायला घराबाहेर पडलेल्या वीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार करून तिचे घर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजू घुडुबास साबखान (वय ३८, रा. तेरणी,
ता. गडहिंग्लज) यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. जगताप यांनी सात वर्षे सक्तमजुरी व
तीन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. अवघ्या दहा महिन्यांत या खटल्याचा निकाल लागला.
खटल्याची अधिक माहिती अशी, तेरणी येथील पीडित विवाहितेचा पती सातारा येथे हॉटेलमध्ये कामास आहे. ती
सासू-सासऱ्यांसमवेत मोलमजुरी करत गावीच राहते. १८ जानेवारी २०१४ रोजी रात्री कचरा टाकण्यासाठी ती घराबाहेर पडली. त्यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
बराचवेळ झाला तरी सून घरी न आल्यामुळे शोधाशोध करताना ती अंधारात निपचिप पडल्याचे सासूच्या निदर्शनास आले. त्यावेळी आरोपीही त्याच्या बाजूला उभा होता. ही घटना
कोणास सांगितल्यास तुमचे सगळे घरच उद्ध्वस्त करीन, अशी धमकी त्याने सासू आणि पीडित महिलेला दिली होती.
दुसऱ्या दिवशी सासूने गावातील पंच मंडळींना हा प्रकार सांगितला. त्यांनी चौकशीसाठी आरोपीला बोलावले. मात्र, तो गेला नाही.
१५ मार्च २०१४ रोजी पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद नोंदवली. सहा. फौजदार एस. एन. कुंभार यांनी चौकशीअंती आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याकामी दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पीडित महिला व प्रत्यक्षदर्शी तिची सासू यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
सुनावनीअंती न्यायाधीश जगताप यांनी आरोपीस बलात्काराच्या गुन्ह्यासाठी सात वर्षे सक्तमजुरी, तीन हजार दंड व दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद आणि धमकीच्या गुन्ह्यासाठी दोन महिने साधी कैद व एक हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे
अॅड. बी. के. देसाई यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)