‘लोकमत’च्या आदित्य वेल्हाळ यांचे छायाचित्र प्रथम
By Admin | Updated: January 16, 2015 00:14 IST2015-01-15T23:57:35+5:302015-01-16T00:14:39+5:30
सिद्धगिरी मठ : भारतीय संस्कृती महोत्सवांतर्गत चित्र-छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर

‘लोकमत’च्या आदित्य वेल्हाळ यांचे छायाचित्र प्रथम
कोल्हापूर : सिद्धगिरी मठ (कणेरी) येथे होणाऱ्या भारतीय संस्कृती उत्सवात चित्र-छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली. यातील खुल्या छायाचित्र स्पर्धेतील प्रथम पुरस्कार ‘लोकमत’चे छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ यांना जाहीर झाला आहे. रोख पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उत्सवात कलादालनाची उभारणी काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून, समन्वयक चित्रकार प्रशांत जाधव यांच्या पुढाकाराने व सिनेदिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्या कलादिग्दर्शनाने साकारली जात आहे. कलादालनातील प्रदर्शनासाठी खुली चित्र-छायाचित्र स्पर्धा झाली. यात सुमारे ३०० कलावंत सहभागी झाले होते. त्याचा निकाल आज, गुरुवारी जाहीर झाला. यातील खुल्या छायाचित्र स्पर्धेत आदित्य वेल्हाळ यांनी कॅमेराबद्ध केलेले छायाचित्र प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांनी कोल्हापुरातील पंचगंगा नदी येथे बेंदूर सणावेळी बैल व मुलगा यांच्यातील नाते व्यक्त करणारे छायाचित्र या स्पर्धेत दाखल केले होते. या छायाचित्राची पुरस्कारासाठी निवड झाली.
पुरस्कार विजेत्या कलावंतांचे व निवडक कलाकृतींचे प्रदर्शन १९ ते २५ जानेवारीदरम्यान उत्सवात होणार आहे. स्पर्धेत प्राचार्य जी. एस. माजगावकर, अभिरक्षक अमृत पाटील, चित्र-शिल्पकार संजीव संकपाळ, चित्रकार एस. निंबाळकर, ज्येष्ठ छायाचित्रकार संजय देवरुखकर, रघू जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी)
स्पर्धेतील अन्य विजेते...
पेंटिंग (चित्र) स्पर्धा : पुरुषोत्तम सरनाईक, संजय आणेकर, शर्वरी गवळी (प्रथम पुरस्कार), सुप्रिया मेस्त्री व स्वप्निल चिनगोंडा (पुरस्कार विभागून). खुली छायाचित्र स्पर्धा : गजानन पारनाईक (इचलकरंजी), प्रकाश पाटील (राधानगरी), रमेश देसाई (आजरा), नंदकुमार पाटील (कोल्हापूर), सतीश वाटवे (सांगली). निसर्गचित्र स्पर्धा : अनघा कुडाळकर, अतीश पाटील, सोहेल बागवान, अक्षय उपासे, बाहुबली हेरलगे.