दिव्यांग सक्षमीकरणाचा पहिला टप्पा सोमवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:05+5:302021-07-03T04:16:05+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ...

दिव्यांग सक्षमीकरणाचा पहिला टप्पा सोमवारपासून
कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व दिव्यांग नागरिकांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित केली जाणार आहे. त्याची सुरवात सोमवारपासून (५ जुलै) होणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांगांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शासकीय विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि आरोग्यविषयक पुढील सेवा उपलब्ध करून देऊन त्यांच्या अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
अभियानाची अंमलबजावणी चार टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व दिव्यांग नागरिकांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित केली जाणार आहे. पहिल्या टप्पा ५ ते १० जुलै या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे. यासाठी सर्व आशा वर्कर्स दिव्यांग व्यक्तीच्या घरी जाऊन सर्वेक्षण करुन त्यांचे फॉर्म भरणार आहेत.
शहरातील सर्व दिव्यांगांनी सर्वेक्षण करायला येणाऱ्या महापालिकेच्या अधिकृत आशा वर्कर्सकडे आपली अचूक माहिती द्यावी. यावेळी आपला फोटो, आधारकार्ड, अपंग प्रमाणपत्र व बँक पासबुकची झेरॉक्स प्रतसुद्धा द्यावीत. दिव्यांग व्यक्तींनी आशा वर्कर्स किंवा महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क करून या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.