पहिल्या टप्प्यात ६० गुंड होणार जिल्ह्यातून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:20+5:302021-08-18T04:31:20+5:30

कोल्हापूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ...

In the first phase, 60 goons will be deported from the district | पहिल्या टप्प्यात ६० गुंड होणार जिल्ह्यातून हद्दपार

पहिल्या टप्प्यात ६० गुंड होणार जिल्ह्यातून हद्दपार

कोल्हापूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात सुमारे ६० गुन्हेगारांचे प्रस्ताव हद्दपारीच्या मंजुरीसाठी पाठवले आहेत. संबंधित यंत्रणेकडे त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षीही उत्सवावर निर्बंध केले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. ते म्हणाले, गणेशोत्सवाच्या कालावधीत गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फाळकुटदादा, काळेधंदेवाल्यांची यादी तयार करून त्यांच्या विरोधात हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ६० रेकॉर्डवरील गुन्हेगाराविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी पाठविले आहेत. मंजुरीसाठी पाठपुरावाही सुरू आहे.

लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. तरुण कार्यकर्ते उत्सवानिमित्त मोठ्या संख्येने एकत्र येतात, त्याचा गैरफायदा हे मटका, जुगार, दारू व्यावसायिक उठवण्याची शक्यता आहे. त्यांच्या माध्यमातून जुगाराचे अड्डे सुरू करून स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतात, तसेच प्रत्येक भागातील फाळकुटदादांच्यात धुसफूस होऊन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रत्येक घटकावर पोलिसांची नजर राहणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता कमिटीच्या बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही अधीक्षक बलकवडे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: In the first phase, 60 goons will be deported from the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.