पहिले प्रेम कधीच विसरत नाही
By Admin | Updated: October 9, 2014 00:46 IST2014-10-09T00:45:54+5:302014-10-09T00:46:16+5:30
कलाकारांचा संवाद : ‘इश्कवाला लव्ह’ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन, ‘लोकमत युवा नेक्स्ट’

पहिले प्रेम कधीच विसरत नाही
कोल्हापूर : प्रत्येकाने आयुष्यात कुणावर तरी प्रेम केलेले असते. ते प्रेम यशस्वी होवो अगर न होवो; परंतु, पहिले प्रेम कधीही आठवले तर मनाला एक वेगळाच आनंद देते, अशा भावना चित्रपट अभिनेत्यांबरोबर युवक-युवतींनी काल, मंगळवारी व्यक्त केल्या. निमित्त होते... ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे आयोजित ‘इश्कवाला लव्ह’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनचे.
मोरेवाडी येथील भारती विद्यापीठ फॉर्मसी कॉलेज व राजाराम महाविद्यालय येथे ‘इश्कवाला लव्ह’ या मराठी चित्रपटातील कलाकार आदिनाथ कोठारे, अभिनेत्री सुलग्ना पाणिग्रही आणि दिग्दर्शक रेणू देसाई यांनी विद्यार्थ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या.
अभिनेते आदिनाथ कोठारे यांनी महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधून प्रेमाबद्दल त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यास महाविद्यालयीन तरुणांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. त्याला अभिनेत्री सुलग्ना पाणिग्रही यांनी साथ दिली. या प्रेमासारख्या नाजूक विषयातून प्राध्यापकही सुटले नाहीत. आदिनाथने त्यांनाही मन मोकळे करण्यास सांगितले.
भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज येथे उपप्राचार्य डॉ. एम. एम. भाटिया यांनी या टीमचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. डी. ए. भागवत, सांस्कृतिक विभागप्रमुख आर. आर. जरग उपस्थित होते. मोसीना मोमीन व इंद्रजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर शालिनी पाटील यांनी आभार मानले. राजाराम महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी यांनी स्वागत केले.
जिव्हाळ्याचा चित्रपट
‘इश्कवाला लव्ह’ या चित्रपटातील कथा महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या जिव्हाळ्याशी निगडित आहे. या चित्रपटातून प्रेम, मनोरंजन याची माहिती मिळतेच; शिवाय प्रत्येक तरुण-तरुणींना ही तर आपलीच कथा आहे, असे वाटते. त्याचबरोबर समाजातील वास्तवही मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.
- अभिनेता आदिनाथ कोठारे
लग्न नको....
हा माझा मराठीतील पहिला चित्रपट आहे. घरातील सर्व व्यक्ती एकत्र बसूनही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. अनेक तरुण-तरुणींना फक्त प्रेम करायचे आहे. मात्र त्यांना लग्न करायचे नाही. त्यांच्या मते लग्नानंतर प्रेम संपते, अशी काहीशी भावना निर्माण झाली आहे. त्यांच्यावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आहे. १० आॅक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र रिलीज होणार असून, तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की हा चित्रपट पाहावा.
- अभिनेत्री सुलग्ना पाणिग्रही
आता लग्न करणार का?
पूर्वी घरामध्ये ‘मुलगा किंवा मुलगी लव्ह मॅरेज करणार का?’ या विषयावर चर्चा होत होती. मात्र, आता ‘मुलगा किंवा मुलगी लग्न करणार आहे का?’ या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. समाजात विविध प्रश्न आहेत़ यामध्ये विवाह आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या बाबीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणाईतून निर्माण होणारे प्रश्न, यामुळे तरुणाईची होणारी घुसमट, आदी बाबींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.
- दिग्दर्शक रेणू देसाई