‘भाजप-ताराराणी’ची पहिली यादी आॅगस्टअखेर
By Admin | Updated: August 17, 2015 00:02 IST2015-08-17T00:02:56+5:302015-08-17T00:02:56+5:30
चंद्रकांतदादा; ६५ उमेदवारांचा समावेश

‘भाजप-ताराराणी’ची पहिली यादी आॅगस्टअखेर
कोल्हापूर : जागा वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी आॅगस्टअखेर जाहीर केली जाईल. यात ६५ उमेदवारांचा समावेश असणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे दिली.भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री पाटील म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आघाडीतर्र्फे उतरणाऱ्या ४० उमेदवारांची यादी तयार आहे. परंतु, इतक्या कमी उमेदवारांची यादी जाहीर करणे संयुक्त वाटत नसल्याने आम्ही किमान ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जागा वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यात आमचा पक्ष राष्ट्रीय व राज्य पातळीवर मोठा असल्याने निश्चितपणे जादा जागा घेईल. स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीत दाखल झाली आहे. ‘आरपीआय’शी बोलणी यशस्वी झाली आहेत.
दानवे यांच्या उपस्थितीत पुढील मेळावामहानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक व पूर्वतयारी म्हणून कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा झाला. त्याला कार्यकर्त्यांसह इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांचा पुढील मेळावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
निवडणुका ३१ आॅक्टोबरला
महापालिका निवडणुका ३१ आॅक्टोबरला होतील. गणेशोत्सवातील १५ दिवस वगळता आपल्याला दोन महिने मिळतात. यात प्रत्येक वॉर्ड पिंजून काढा. नागरिकांना आपल्या व अन्य पक्षांतील फरक सांगून मते मिळवा. एकदिलाने कार्यरत राहा, असे आवाहन चंद्रकातदादांनी केले.