नव्या बायोगॅसचा पहिला प्रयोग कोल्हापुरात
By Admin | Updated: February 26, 2015 00:13 IST2015-02-25T22:12:03+5:302015-02-26T00:13:58+5:30
निगवे खालसात चार कामे सुरू : मध्य प्रदेशातील अधिकारी प्रशिक्षणासाठी दाखल

नव्या बायोगॅसचा पहिला प्रयोग कोल्हापुरात
आयुब मुल्ला - खोची - नव्या तांत्रिक नियमानुसार बांधण्यात येणाऱ्या बायोगॅसचा पहिला प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यात होणार आहे. यासाठी केंद्र शासन नियुक्त इंदौर (मध्य प्रदेश) येथील बायोगॅस विकास व प्रशिक्षण केंद्राचे तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथे गवंडी प्रशिक्षणातून चार बायोगॅस बांधण्याचा प्रारंभ झाला आहे. जवळपास याच धर्तीवर राज्यांत किंबहुना देशात असे बायोगॅस बांधण्यात येणार आहेत.
केंद्रपुरस्कृत अनुदानावर आधारित राष्ट्रीय बायोगॅस योजना प्रभावीपणे राबविण्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत या योजनेविषयी प्रचार व प्रसार चांगल्या पद्धतीने झाल्यानेच राज्यात कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. देशातील अनेक उच्च अधिकाऱ्यांनी ही योजना यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने येथे भेट देऊन तिचा अभ्यास व त्या पाठीमागची कारणे तपासली आहेत. त्या धर्तीवर ती इतर ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या शासनाने बायोगॅस बांधण्यासाठी काही तांत्रिक दुरुस्त्या सुचविल्या आहेत. त्यानुसार मार्गदर्शक सूचनाही परिपत्रकान्वये दिल्या आहेत. संपूर्ण देशासाठी या लागू आहेत. यासाठी काही प्रशिक्षण केंद्रांची निवड केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड या राज्यांसाठी इंदौर येथील बायोगॅस विकास व प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे.
प्रशिक्षण आयोजित करण्याचे पहिले ठिकाण म्हणून कोल्हापूर निवडले आहे. दहा दिवसांत गवंड्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून तांत्रिक नियमानुसार बायोगॅस बांधण्यात येणार आहेत. हे अधिकारी स्वत: त्यांना मार्गदर्शनातून त्या बांधणीचे फायदे सांगणार आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीला फाटा देऊन नव्या धाटणीनुसार आता बायोगॅस बांधले जाणार आहेत. बायोगॅसचा कोल्हापूर पॅटर्न राज्यात प्रसिद्ध आहे, तो आणखीन प्रसिद्ध होईल. लवकरच हे बांधकाम पाहण्यास डायरेक्टर आॅफ बायोगॅस एनर्जी, नवी दिल्लीचे जी. एल. मीना भेट देणार आहेत.