प्रथमेश आमच्यासाठी देवदूतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:34+5:302021-06-09T04:30:34+5:30
रवींद्र येसादे उत्तूर : घरात दु:खद घटना घडल्याने बाराव्या दिवशीचे नियोजन होते. त्या दिवशी कोरोनाने घरात संसर्ग झाला. सात ...

प्रथमेश आमच्यासाठी देवदूतच
रवींद्र येसादे
उत्तूर : घरात दु:खद घटना घडल्याने बाराव्या दिवशीचे नियोजन होते. त्या दिवशी कोरोनाने घरात संसर्ग झाला. सात जणांना टप्प्या-टप्प्याने कोरोना झाला. संकटकाळात देवदूत म्हणून समोर आला तो वडकशिवाले (ता. आजरा) येथील प्रथमेश संजय शिंदे (वय २१) हा युवक. या युवकाने केलेली मदत कौतुकास्पद आहे.
गावचे माजी उपसरपंच तातोबा खराडे यांचे गावातच दु:खद निधन झाले. बाराव्या दिवशी घरातच कोरोनाचा संसर्ग झाल्याने खराडे कुटुंबीय भयभयीत झाले. घरात दु:खाचा प्रसंग व ओढावलेला कोरोनाचा संसर्ग या दुहेरी पेचात खराडे कुटुंबीय होते.
मृत खराडे यांची सून शिल्पा हिला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने तिला उपचारासाठी नेणे गरजेचे होते. सरकारी वाहनही उपलब्ध झाले नाही. प्रथमेशने कोणतेही तमा न बाळगता स्वत: कोरोनाबाधित रुग्णाला गडहिंलजला एका खासगी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी नेले तेथे अहवाल पॉझिटिव्ह आला.
दुसऱ्या दिवशी सुनेचा पती विजय हा कोरोनाबाधित झाला. त्यापाठोपाठ दीर अनिल, भावजय अनिता, सासू सुमन हे सारेजण बाधित आढळले. घरातील सर्व कोरोनाबाधित झाल्याने खराडे कुटुंबीय हतबल झाले होते. मात्र, या साऱ्यांना धीर देण्याचे काम प्रथमेशने केले.
महिनाभर कोरोनाबाधितांच्या सेवेतच प्रथमेश होता. डबे, औषधे देणे रुग्णांना धीर देण्याचे काम त्याने केले. रेमडेसेवीर हे इंजेक्शन मिळविण्यासाठी त्याला मोठी कसरत करावी लागली. वेळेवर उपचार सुरू झाल्याने रुग्णही ठीक होत असताना मृताचे भाऊ विष्णू खराडे गडहिंग्लज येथील निर्भया कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका महिन्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.
खराडे यांचा मृतदेह गावी आणण्याचा निर्णय झाला. प्रथमेशने पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोनावर मात करत खराडे कुटुंबीय घरी परतले पण प्रथमेश हा कोरोनाबाधित झाला. पुन्हा खराडे कुटुंबीयांचा धीर खचला. प्रथमेशने धाडसाने कोरोनावर मात करून घरी परतला. प्रथमेश हा खराडे कुटुंबीयांचा देवदूतच बनला.
-------------------------
* धाडसाचे कौतुकच
कोरोनाबाधित रुग्णांना कोणतेही सरकारी वाहन उपलब्ध नसताना स्वत: वाहनातून ने-आण करून रुग्णांची देखभाल करणे जिकीरीची गोष्ट होती. त्याच घरातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. या साऱ्या प्रसंगात प्रथमेशच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. औषधोपचाराने प्रथमेश कोरोनामुक्त झाला.
- विजय खराडे, वडकशिवाले.
-------------------------
* प्रथमेश शिंदे : ०८०६२०२१-गड-०२