आग विझवताना ‘अग्निशमन’चे दोघे जवान जखमी
By Admin | Updated: May 15, 2017 16:30 IST2017-05-15T16:30:29+5:302017-05-15T16:30:29+5:30
मंगळवार पेठेत घरास आग : शॉर्टसर्किटने दुर्घटना; अडीच लाखाचे नुकसान

आग विझवताना ‘अग्निशमन’चे दोघे जवान जखमी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १५ : मंगळवार पेठेतील जासूद गल्ली येथे राहणाऱ्या सुजाता वसंत पाटील यांच्या राहत्या घरी रविवारी रात्री उशीरा शॉर्टसर्किटने आग लागली. त्यात घरातील प्रापंचिक साहित्य जळाले. दरम्यान, आग विझवताना वीजेचा धक्का लागल्याने अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. सग्राम मोरे व श्रीधर चाचे अशी या दोन जवानांची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जासूद गल्ली येथे राहणाऱ्या सुजाता पाटील यांच्या घरी रविवारी रात्री उशीरा शॉर्टसर्किटने प्रथम टीव्हीस आग लागली. ही आग रेफ्रिजरेटरला लागली. बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केले. या दरम्यान पाटील यांनी गॅस सिलिंडर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. तेथेच टाकून त्या व मुलगी बाहेर पडल्या. आगीची वर्दी अग्निशमन दलास दिली. टिंबर मार्केट आणि लक्ष्मीपूरी येथील दोन अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आल्या. अग्निशमन दलाची गाडी जुन्या शाहू बँकेसमोर आली पण तेथून एका मंडळाची मिरवणूक जात होती. त्यामुळे पुन्हा गाडी आत येण्यास विलंब झाला.
ही गाडी गुलाब गल्ली येथून आत आणण्यात आली. त्यामुळे अर्धा तास उशीर झाला. त्यात घरातील संपूर्ण प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. त्यात एकच खोली व वरून लोखंडी पत्रा असल्याने काही काळ आग धुमसत होती. या घरातील स्वयपाकाचा गॅस बाहेर काढताना त्यात वीजेचा शॉक लागल्याने अग्निशमन दलाचे संग्राम मोरे, श्रीधर चाचे हे जखमी झाले, त्यांना तातडीने सावित्रीबाई फुले रुग्णालयात प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारसाठी सीपीआर रुग्णालयात हालवले. ही आग अग्निशमन दलाने विझवली. यावेळी परिसरातील वीज बंद केल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते. ही आग रात्री उशिरापर्यंत जळालेल्या या घराचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.