राजकारणासाठी ‘गडहिंग्लज’ संपविला
By Admin | Updated: March 22, 2016 00:36 IST2016-03-21T23:52:17+5:302016-03-22T00:36:50+5:30
सुरेश हाळवणकर : कारखान्याच्या गतवैभवासाठी विस्तारीकरण गरजेचे; भडगावात काळभैरव पॅनेलचा मेळावा

राजकारणासाठी ‘गडहिंग्लज’ संपविला
गडहिंग्लज : गडहिंग्लज कारखान्यातील सत्तेचा वापर केवळ राजकारणासाठीच झाला. त्यामुळेच नेते मोठे झाले आणि कारखाना आहे तिथेच राहिला. किंबहुना, स्वार्थी राजकारणामुळेच गडहिंग्लज कारखान्याची अधोगती झाली, असे स्पष्ट मत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केले.
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे श्री काळभैरी शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार संजय घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, भाजपचे जिल्हा संघटक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
हाळवणकर म्हणाले, गडहिंग्लज कारखान्याच्या गतवैभवासाठी गाळप क्षमतावाढ आणि विस्तारीकरणाशिवाय पर्याय नाही. भूमिपुत्रांच्या हाती सूत्रे आल्याशिवाय कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा होणार नाही. शेतकऱ्यांच्या व कारखान्याच्या भल्यासाठी राज्याचे सर्वतोपरी सहकार्य राहील.
डॉ. प्रकाश शहापूरकर म्हणाले, नलवडे यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेण्याच्या प्रकाराशी माझा काडीचा संबंध नाही. त्यावेळी मी केवळ साधा संचालक होतो. पॅनेलचे नेते कुपेकर यांच्या सांगण्यावरूनच नलवडे यांचे अधिकार काढून उपाध्यक्ष विलासराव बागी यांना देण्यात आले. बेकायदा नेमलेल्या ४२९ कामगारांच्या पगारपत्रकावर नलवडे यांनीच सही केली नव्हती. त्यामुळे त्या कामगारांना काढून टाकण्याशीही माझा संबंध नव्हता.
उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, प्रा. किसनराव कुराडे, घाटगे, देवणे यांचीही भाषणे झाली. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, सदानंद हत्तरकी, संग्राम कुपेकर, परशराम तावरे, पुंडलिक धनवडे, अनिल खोत, दिलीप माने, वसंत नाईक, आदींसह उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते. सुभाष चोथे यांनी प्रास्ताविक केले. गणपतराव पट्टणकुडी यांनी सूत्रसंचालन केले. दयानंद कोणकेरी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
डॉ. शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे सत्ता आल्यानंतर ‘ब्रीसक्’च्या कराराचा हिशेब तपासून त्यांचा हिशेब चुकता करून कंपनीला परत पाठवू आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कारखान्याच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन केले जाईल, अशी ग्वाही आमदार हाळवणकर यांनी यावेळी दिली.