वृद्ध कलावंतांची परवड...
By Admin | Updated: December 9, 2014 00:26 IST2014-12-09T00:19:38+5:302014-12-09T00:26:21+5:30
मानधन थकले : कलाकार संघ आज देणार निवेदन

वृद्ध कलावंतांची परवड...
कोल्हापूर : गेल्या सात महिन्यांपासून मानधन थकल्याने वृद्ध कलावंतांची परवड होत आहे. जिल्ह्यात १ हजार १११ वृद्ध कलाकार मानधनास पात्र आहेत. मानधनासाठी त्यांचे जिल्हा परिषदेमध्ये हेलपाटे सुरू आहेत. थकीत मानधनासह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघातर्फे उद्या, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.
लोककला, तमाशा, शाहिरी, नाट्य व चित्रपट, भजन, कीर्तन, नृत्य, संगीत या क्षेत्रांतील कलावंतांना शासनाकडून मानधन दिले जाते. तालुकास्तरावरील लाभार्थी कलावंतांना महिन्याला १००० रुपये, राज्यस्तरावरील कलावंताला १२०० रुपये, चित्रपट क्षेत्रातील कलावंताला १४०० रुपये असे मानधन शासनाकडून दिले जाते. वर्षातून दोनवेळा हे मानधन शासनाकडून दिले जाते. शासनाने मार्च ते जूनपर्यंतचे ३४ लाख ९६ हजार इतके मानधन शासनाकडून कलावंतांना दिले आहे. पण, जून ते डिसेंबरपर्यंतचे मानधन त्यांना मिळालेले नाही. त्यासाठी कलावंतांचे जिल्हा परिषदेमध्ये हेलपाटे सुरू आहेत. थकीत वेतनासह विमा, घरकुल आणि आरोग्य योजना, ओळखपत्र देणे असे विविध प्रश्न प्रलंबित असल्याचे लोककलाकार संघाचे अध्यक्ष विलास पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, संघाकडून साडेचार हजार कलाकारांची नोंदणी आहे. त्यापैकी १ हजार १११ कलावंत मानधनासाठी पात्र आहेत. मात्र, त्यांना अनियमित मानधन मिळते. ते वेळेवर मिळावे तसेच प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी उद्या, जिल्हाधिकारी राजाराम माने यांना निवेदन देणार आहे. (प्रतिनिधी)