सुपारी देणाऱ्या धर्ममार्तंडांनाही शोधा

By Admin | Updated: November 25, 2015 00:54 IST2015-11-25T00:47:07+5:302015-11-25T00:54:48+5:30

विराट निर्धार परिषदेत आवाहन : ‘सनातन’वर कारवाई करा, तपासाची कागदपत्रे उच्च न्यायालयात देण्याचा ठराव

Find godmothers who give you a bet | सुपारी देणाऱ्या धर्ममार्तंडांनाही शोधा

सुपारी देणाऱ्या धर्ममार्तंडांनाही शोधा

कोल्हापूर : धर्ममार्तंडांच्या शक्तीला विरोध करणारे दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या करणारे कोण आहेत, हे पोलिसांनी शोधून काढले आहे; पण त्यांना सुपारी देणाऱ्यांचाही पोलिसांनी शोध घ्यावा, असे आवाहन केले. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातिमुक्त आंदोलनाच्या वतीने या विराट निर्धार परिषदेचे आयोजन मंगळवारी दुपारी येथील दसरा चौकात करण्यात आले होते.
या निर्धार परिषदेत डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी सुरू असलेला तपास संथगतीने व निर्जीव पद्धतीने सुरू असून त्याचा निषेध करून; या प्रकरणी पोलीस यंत्रणेकडे तपासकामात नोंदणीकृत असणारी कागदपत्रे मुंबई उच्च न्यायालयाकडे सादर करावीत, ‘सनातन’ या संघटनेच्या कामांची व त्यांच्या नेत्यांची कसून चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, असे तीन ठराव यावेळी केले. भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील उपस्थित होते.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ही परिषद संघर्षाला सलाम होती. धर्मांध शक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली राज्यघटना मान्यच नाही; त्यामुळे राज्यघटनेलाच धोका निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीत संसदीय लोकशाहीला आव्हान करणारी धर्ममार्तंडांची सत्ता निर्माण झाली आहे. हे आव्हान परतवण्यासाठी आपण ताकदीने लढा उभारण्याची गरज आहे. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांच्या फक्त विचाराचे अपुरे राहिलेले जीवनकार्य पुढे न्या.
डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर दबाव येत आहे. या नेत्यांच्या हत्येतील पुरावे मिळाले आहेत. गोळ्या मारणारा हाती लागला; पण सुपारी देणाऱ्याचाही शोध घ्यावा. जर सत्ताधारी आणि पोलीस संशयितांना संरक्षण देणार असतील तर आम्हीही त्याविरोधात संघर्ष करू.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, सनातनवाद्यांविरोधात आपणालाही संघर्ष करावा लागत आहे. ही ऐतिहासिक लढाई आहे. येथून पुढे आमच्या चळवळीतील नेत्यालाच नव्हे कार्यकर्त्यालाही बोट लावण्याचे धाडस या धर्मांध शक्ती करणार नाहीत याची खात्री बाळगा.
कॉ. भालचंद्र कानगो यांनीही विचार मांडले. कॉ. चंद्रकांत यादव यांनी स्वागत केले. कॉ. दिलीप पवार यांनी प्रास्ताविक केले; तर अतुल दिघे यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी गुरव, संग्राम सावंत, वलीअली कादरी, किशोर जाधव, मिलिंद रानडे, महेंद्रसिंग, गेल आॅम्व्हेट, प्रतिमा परदेशी, भीमराव बनसोड यांनी धर्मांध जातीय शक्तींना रोखण्याचे आव्हान केले. यावेळी किशोर ढमाले यांनी ठरावाचे वाचन केले. यावेळी उमा पानसरे, मेघा पानसरे, अशोक ढवळी, नामदेवराव गावडे, अ‍ॅड. बन्सी सातपुते, रघुनाथ कांबळे, आदी उपस्थित होते.

Web Title: Find godmothers who give you a bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.