कोल्हापूर : संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशीनगरातील झोपडपट्टीत राहून परिस्थितीशी संघर्ष करणारी १७ वर्षांची करीना गळवे आणि एसएसपीई या दुर्मीळ आजारावर मात करत मृत्यूशी झुंज घेत झगडणाऱ्या हातकणंगलेतील सात वर्षांच्या ओवी पुजारी या दोन मुलींच्या जगण्याला लोकमतच्या बातमीमुळे उभारी मिळाली. या दोन्ही जिद्दी मुलींचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच त्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे करणाऱ्या दात्यांमुळे समाजाने अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.फॅशन डिझायनिंगचे स्वप्न पाहणारी करिना हे विशेष वृत्त ४ एप्रिल रोजी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच सायबर या शैक्षणिक संस्थेने करिना गळवे या संभाजीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. या संस्थेतील फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमाचे प्राचार्य आर. जी. कुलकर्णी यांनी या बातमीची दखल घेऊन लोकमतच्या प्रतिनिधीशी तातडीने संपर्क साधत तिच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. त्यांनी या मुलीच्या घरी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना पाठवून त्यांच्याशी चर्चा केली आणि पुढील शिक्षणाबाबत आश्वस्त केले.करिनाने बारावीची परीक्षा दिली आहे. त्याचा निकाल लवकरच लागेल. त्यानंतर तिच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाईल असे कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, कलाशिक्षक मिलिंद यादव यांनी लोकमतच्या लेखणीचा सकारात्मक उपयोग झाल्याचे सांगून नरेंद्र जाधव यांच्या 'आमचा बाप आन् आम्ही' या पुस्तकातील एका प्रसंगाची आठवण सांगत अशाप्रकारे सर्वसामान्याला उपयोग झाल्याबद्दल कौतुक केले.ओवीला उपमुख्यमंत्र्यांकडून मदतएसएसपीई हा दुर्मीळ आजारावर मात करण्यासाठी लढणाऱ्या सात वर्षांच्या हातकणंगलेतील ओवी सागर पुजारीचे वृत्त लोकमतच्या ऑनलाइन टीमच्या दूर्वा दळवी यांनी प्रसिद्ध करताच तिच्यासाठी कोल्हापूरकरांनी मदतीचा ओघ सुरू केला. ओवीच्या उपचारासाठी अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी ९० हजार रुपयांहून अधिक अर्थसाहाय्य केलेले आहे. अजूनही हा ओघ सुरूच आहे. यामुळे पुजारी कुटुंबीयांना आधार मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी जिल्हा दौऱ्यावर असताना पुजारी यांची भेट घेत ओवीच्या आजाराची माहिती घेतली आणि तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे जाहीर केले आहे. शिंदे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे पुजारी कुटुंबीय भारावून गेले आहेत.