‘मुद्रा’साठी २१३ कोटींवर अर्थसाहाय्य
By Admin | Updated: July 6, 2016 01:09 IST2016-07-06T01:00:35+5:302016-07-06T01:09:55+5:30
योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद : समन्वय समिती बैठकीत प्रसार करण्याचे सैनी यांचे आवाहन
‘मुद्रा’साठी २१३ कोटींवर अर्थसाहाय्य
कोल्हापूर : जिल्ह्यात ‘मुद्रा’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध बँकांच्या माध्यमातून आतापर्यंत २३ हजार २७१ लाभार्थ्यांना २१३ कोटी ४८ लाखांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी दिली. मुद्रा योजना होतकरू, बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिर्तीसाठी साहाय्यभूत ठरणारी योजना असल्याने जिल्ह्यात तिचा प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याचे आदेशही सैनी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रा बँक जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जिल्हा अग्रणी व्यवस्थापक एम. जी. कुलकर्र्णी, जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीच्या सदस्य सचिव वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी एस. आर. माने, उद्योग केंद्राच्या मंजूषा चव्हाण, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे अधिकारी राजेंद्र कामत, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी एस. एस. शेळके, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील होतकरू तरुणांना मुद्रा योजनेद्वारे अर्थसाहाय्य देण्यास बँकांनी सक्रिय व्हावे, असे निर्देश सैनी यांनी दिले. यापुढील काळातही तरुण लघुउद्योजकांना अर्थसाहाय्य करून योजना प्रभावीपणे राबविली जाईल. सहकारी, राष्ट्रीय, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगरबँक वित्तीय संस्थांच्या माध्यमातून तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरू, बेरोजगार तसेच छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांनाही कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तसेच सुतार, गवंडीकाम, कुंभार, सलून, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते, लहान व्यवसायांसाठीही कर्ज देण्याची तरतूद यात केली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात मुद्रा योजना २०१५ पासून राबविली जात असून, आतापर्यंत २३ हजार २७१ खातेदारांना २१३ कोटी ४८ लाखांचे अर्थसाहाय्य विविध बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये शिशू योजनेंतर्गत १९ हजार ८२० तरुणांना ६६ कोटी १४ लाख, किशोर योजनेंर्गत दोन हजार ७५१ तरुणांना ९५ कोटी ९७ लाख आणि तरुण योजनेंतर्गत ७०० तरुणांना ५१ कोटी ३६ लाखांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.