...अखेर शोनची प्राणज्योत मालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:20+5:302021-05-17T04:22:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : गेले नऊ महिने ब्रेन ट्युमर आजाराशी झुंज देण्याऱ्या पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) ...

...अखेर शोनची प्राणज्योत मालवली
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : गेले नऊ महिने ब्रेन ट्युमर आजाराशी झुंज देण्याऱ्या पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील शोन श्रीकांत काशिद या सहा वर्षांच्या मुलाची अखेर प्राणज्योत मालवली. सर्वसामान्य असलेल्या कुटुंबाने शोनला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले; परंतु यात त्यांना अपयश आले. आजारातून उठून अंगणात बागडणाऱ्या शोनला पुन्हा आजाराने कवटाळले. मनाला चटका लावून जाणाऱ्या त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थी दिवशी वाढदिवसादिवशी शोनला चक्कर आली. त्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या तर त्याला ब्रेन ट्युमर झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्यावर आई-वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. शोनवरती खाजगी रुग्णालयात मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो तीन महिने बेशुद्धावस्थेत बेडवर पडून होता. त्याला वाचविण्यासाठी वडील आणि आजोबांची धडपड केविलवाणी होती. तीन महिन्यांनंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन तो बेडवरून उठून घरादारात फिरत असल्याने त्याच्या गंभीर आजाराचे संकट टळले असल्याची आनंदाची भावना सर्वांच्या मनात होती. शांत आणि हुशार असलेला शोन मोठा असूनही लहान भावाचा लाडका होता.
अचानक दीड महिन्यापूर्वी त्याच्या प्रकृतीत बदल झाला आणि ट्युमरचा आजार बळावला. तो पुन्हा बेशुद्धावस्थेत गेला. त्याला या आजारातून वाचविण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून औषधांची उपलब्धता केली होती. यासाठी १६ लाख रुपये खर्च करून आणखी खर्च करण्याची आई-वडिलांची तयारी होती; परंतु नियतीच्या मनात काही औरच होतं. अखेर नऊ महिने आजाराशी झुंज देणाऱ्या शोनची प्राणज्योत मालवली.
..................शोन श्रीकांत काशिद