...अखेर शिष्यवृत्ती निधीचा प्रश्न मार्गी
By Admin | Updated: December 9, 2015 01:54 IST2015-12-09T01:42:18+5:302015-12-09T01:54:32+5:30
‘लोकमत’चा दणका : निधी परत घेऊन पुन्हा दिला; अडचण दूर

...अखेर शिष्यवृत्ती निधीचा प्रश्न मार्गी
कोल्हापूर : ‘शिष्यवृत्तीचे दीड कोटी एका सहीसाठी पडून’ या मथळ्याखाली शनिवारी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेत पुणे येथील समाजकल्याण उपायुक्तांनी निधीचा प्रश्नी मार्गी लावला आहे. एक कोटी ४५ लाख रुपये पुन्हा खात्यावरून घेत आवश्यक त्या पत्रासह पहिल्या टप्प्यासाठी दोन कोटी रुपये शिष्यवृत्तीसाठी पुन्हा जमा केले आहेत. त्यामुळे यंदा आॅनलाईन शिष्यवृत्तीचा अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून दरवर्षी इयत्ता पाचवी ते सातवीत शिकणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती आणि आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनीला वर्षाला ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. नववी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपये मिळतात.
शिष्यवृत्ती देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त (पुणे) एम. आर. वैद्य यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील खात्यावर जून महिन्यात निधी जमा केला होता. वैद्य यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली. त्यांना पदावरून दूर व्हावे लागले. त्यांनी निधी काढण्यासंबंधी आवश्यक लेखी आदेश दिला नाही. त्यांच्या जागी नूतन उपायुक्त म्हणून विजया पवार रूजू झाल्या. त्यानंतर त्यांनी शिष्यवृत्तीचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी सहीचा आदेश द्यावा, अशी विनंती येथील समाजकल्याण अधिकारी सुंदरसिंह वसावे यांच्याकडे केली. मात्र, तत्कालिन उपायुक्तांनी निधी खात्यावर जमा केला आहे. त्यामुळे मी माझ्या सहीचा आदेश देऊ शकत नाही, असे उत्तर वसावे यांना मिळाले होते. यासंबंधी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची त्वरित दखल घेत सोमवारी उपायुक्तांनी खात्यावर जमा केलेली रक्कम परत घेत त्याच दिवशी लेखी पत्रासह पुन्हा दोन कोटींचा निधी शिष्यवृत्तीसाठी खात्यावर जमा केला आहे. परिणामी आता शिष्यवृत्ती मिळण्यातील अडचण दूर झाली आहे.