...अखेर माउलींचा मार्ग झाला खुला !
By Admin | Updated: July 12, 2015 00:36 IST2015-07-12T00:33:20+5:302015-07-12T00:36:09+5:30
लोणंदला आढावा बैठक : प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविली

...अखेर माउलींचा मार्ग झाला खुला !
लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर माउलींचे जिल्ह्यात स्वागत केल्यापासून ते पालखी तळापर्यंतच्या मार्गात अनेक व्यावसायिकांनी टपऱ्या टाकून अतिक्रमण केले होते, तसेच राजकीय नेत्यांनी वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावले होते. त्यामुळे वारकऱ्यांना अडथळे ठरत होते. अतिक्रमणे शनिवारी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत ही शंभरहून अधिक अतिक्रमणे, अडथळे हटविली.
आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा मेळा गुरुवारी (दि. १६) लोणंदनगरीत विसावत आहे. माउलींचे स्वागत व नीरा नदीत स्नान गुरुवारी दुपारी होणार आहे. नीरास्नान केल्यानंतर वारकरी लोणंदनगरीत मुक्कामी येत असतात. माउलींच्या दर्शनासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून भाविक येत असतात. या गर्दीचा लाभ घेण्यासाठी काहींनी गेल्या वर्षी रस्त्याच्या कडेला जीवनाश्यक वस्तूंची छोटी दुकाने टाकली होती. ती तशीच उभी आहेत. तसेच स्थानिक राजकीय नेतेमंडळी वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावून स्वत:ला मिरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या अतिक्रमणामुळे वारकऱ्यांना मार्गक्रमण करणे अडचणीचे ठरते.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद येथे शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर म्हणाले, ‘वारकऱ्यांचे स्वागत त्यांचा पाहुणचार करून करावे, त्यांच्या स्वागताचे फलक लावून अडचणी येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. पालखी मार्गातील अतिक्रमणे काढली आहेत, ती पुन्हा होणार नाहीत, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी.
पालखीतळावर पाण्याचे टँकर व चोवीस तास पाण्याची सोय करावी, आरोग्य विभागाने औषधांचा साठा, रुग्णवाहिका, डॉक्टरांची पथके तयार ठेवावीत. आपत्कालीन यंत्रणा राबवून सर्वांनीच प्रामाणिकपणे कामे करावीत.’ यावेळी तहसीलदार शिवाजी तळपे, गटविकास अधिकारी विलास साबळे, जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता संजय भोसले, जिल्हा परिषदेचे सदस्य आनंदराव शेळके-पाटील, बांधकाम उपअभियंता युवराज देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चोपडे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच स्नेहलता शेळके-पाटील, सदस्य शिवाजीराव शेळके, दादासाहेब ठोंबरे, शंकर क्षीरसागर, प्रदीप क्षीरसागर, ग्रामविकास अधिकारी लालासाहेब निंबाळकर, बाळासाहेब भिसे, गजेंद्र मुसळे उपस्थित होते. (वार्ताहर)