...अखेर ‘केएमटी’चा संप मागे
By Admin | Updated: July 8, 2014 01:06 IST2014-07-08T01:02:32+5:302014-07-08T01:06:22+5:30
चर्चेत सकारात्मक तोडगा

...अखेर ‘केएमटी’चा संप मागे
कोल्हापूर : महापौर सुनीता राऊत व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज, सोमवारी दिवसभर जलदगतीने हालचाली करीत ‘केएमटी’च्या कर्मचाऱ्यांशी केलेल्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघाल्याने ‘केएमटी’ कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून बेमुदत पुकारलेला संप मागे घेतला. महापालिका प्रशासनाने ‘केएमटी’ला आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला २२ लाखांचा हप्ता ‘केएमटी’च्या खात्यावर वर्गही करण्यात आला. यानंतर महापौरांनी संप मागे घेण्यासाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत कर्मचारी संघटनांनी माघार घेतली.
थकीत पगारासह पुढील वेतन वेळेत द्या, हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करा, सहावा वेतन आयोग लागू करा, वर्क कमिटी स्थापन करा, सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश द्या, महापालिकेच्या दवाखान्यात मोफत औषधोपचार करा, महागाई भत्ता वेतनात समाविष्ट करा, आदी मागण्यांसाठी सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून संपावर जाण्याचा निर्णय केएमटीतील कर्मचाऱ्यांनी घेतला होता. दोन महिने पगार थकल्याने जगणेही मुश्कील झाले आहे. केएमटी व महापालिका प्रशासनास लक्ष देण्यास वेळ नाही, असा आरोप करीत काम बंद ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला होता.
या पार्श्वभूमीवर आज दिवसभर महापालिकेत बैठकांच्या फेऱ्या झाल्या. सकाळी महापौर राऊत, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, परिवहन समिती सभापती वसंत कोगेकर, चंद्रकांत घाटगे, मुरलीधर जाधव, सुनील पाटील, राजू लाटकर यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत केएमटीकडे नवीन गाड्या येऊन आर्थिक परिस्थिती सुधारेपर्यंत मदतीचा हात देण्याचे ठरले. पगारासाठी तातडीने २२ लाख, तर दोन दिवसांत पुन्हा ४२ लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला.
दुपारी कामगार संघटनांची बैठक घेऊन महापौर सुनीता राऊत यांनी बैठकीतील निर्णय सांगून संप मागे घेण्याचे आवाहन केले. महापौरांच्या आवाहनास प्रतिसाद देत म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्क र्स युनियनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनी संपात सहभागी होणार नसल्याचे लेखी पत्र महापौरांसह प्रशासनास दिले.