कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. निवडणुकीची अधिसूचना आज, मंगळवारी तहसीलदारांमार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासूनच गावागावांतील स्थानिक राजकारणात धुमशान उडणार आहे.
एप्रिल ते डिसेंबरअखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. प्रारुप मतदार यादीवर अनेक हरकती आल्याने आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी वाढवून दिला होता. त्यानुसार सोमवारी सकाळीच अंतिम मतदार यादी तहसील कार्यालय, ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार आज, मंगळवारी तहसीलदारांमार्फत निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर २३ ते ३० तारखेदरम्यान अर्ज भरणे, छाननी, माघार, चिन्ह वाटप ही प्रक्रिया झाल्यानंतर १५ जानेवारीला मतदान व १८ जानेवारीला मतमोजणी होईल. तोपर्यंत पुढील महिनाभर जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील निवडणूक लागलेल्या ४३३ ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक गटा-तटाच्या राजकारणाचा फड रंगणार आहे.
----
इंदुमती गणेश