‘मंडलिक’चा अंतिम दर ३१५०
By Admin | Updated: July 17, 2017 00:36 IST2017-07-17T00:36:17+5:302017-07-17T00:36:17+5:30
‘मंडलिक’चा अंतिम दर ३१५०

‘मंडलिक’चा अंतिम दर ३१५०
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : सदाशिवराव मंडलिक यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणेच कारखान्याची वाटचाल असून, अनावश्यक खर्चाला फाटा देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊसदर देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याकडे आलेल्या उसाला एफ.आर.पी.प्रमाणे २५९० व १७५ असा २७६५ रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना अदा केला आहे. दुसरा हप्ता १३५ रु.प्रमाणे गणेश चतुर्थीपूर्वी आणि तिसरा अंतिम हप्ता १०० रु.प्रमाणे दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करू. उशिरा गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन १०० रूपये व पिकविलेला संपूर्ण ऊस गाळपास पाठविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ५० रुपये जादा अनुदान देण्यात येणार आहे. सर्व बाबींचा विचार करता आपल्या कारखान्याचा प्रतिटन ऊसदर ३१५० रुपये होत असल्याची माहिती सदाशिवरा मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. मंडलिक म्हणाले, गाळप उद्दिष्टानुसार कारखाना प्रशासन ऊस तोडणी यंत्रणा व इतर आवश्यक बाबींचे नियोजन करते, परंतु जर उद्दिष्ट्यपूर्ती न झाल्यास सर्वच घटकांना याचा फटका बसतो.
यावेळी माजी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक वीरेंद्र मंडलिक, बंडोपंत चौगुले-म्हाकवेकर, प्रा. बापुसो भोसले-पाटील यांच्यासह कारखान्याती सर्व खाते अधिकारी उपस्थित होते.
...अन् मंडलिकांनी शब्द पाळला
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस मंडलिक कारखान्याला देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ५० रुपये जादा अनुदान देण्याची घोषणा प्रा. मंडलिक यांनी केली होती, परंतु गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे कारखान्याचे गाळप उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने आर्थिक स्थिती कोलमडली. तरीही प्रा. मंडलिकांनी दिलेला शब्द पाळत हे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. गतवर्षी तीन लाख ५५ हजार ६५० मे. टन उसाचे गाळप झाले असून, त्यापोटी कारखान्याकडून शेतकऱ्यांना सुमारे ११० रुपये दिले जाणार आहेत.
आज विजयी मेळावा
आज, सोमवारी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या बिनविरोध संचालकांचा सत्कार समारंभ व विजयी मेळावा होणार आहे, अशी माहिती प्रा. मंडलिक यांनी दिली.