कलानगरीत चित्रपटाची निर्मिती नगण्यच
By Admin | Updated: December 2, 2014 00:49 IST2014-12-02T00:40:20+5:302014-12-02T00:49:54+5:30
चित्रपट महामंडळाला वादाचे ग्रहण : गतवैभव आणण्यासाठी औदासीन्यता झटकण्याची गरज

कलानगरीत चित्रपटाची निर्मिती नगण्यच
इंदुमती गणेश - कोल्हापूर -‘चित्रपटसृष्टीची गंगोत्री’ असलेल्या कोल्हापूरला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर चित्रनगरीशिवाय पर्याय नाही ही मागणी केली जात आहे. मात्र, कोल्हापूरच्या मातीत दर्जेदार चित्रपट निर्माण होणे ही बाब आता इतिहासजमा झाली आहे. एकीकडे हिंदी सिनेसृष्टीला भुरळ पडली असताना येथील चित्रपट व्यावसायिकांमध्ये असलेले औदासीन्य या अवस्थेला कारणीभूत ठरले आहे. दुसरीकडे चित्रपट महामंडळ वादाच्या भोवऱ्यातून बाहेर पडण्याची चिन्हे दिसेनात.
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी चित्रपट व्यवसायाला सुरुवात केली तो १ डिसेंबर हा दिवस कोल्हापूर चित्रपट व्यवसायाचा वर्धापन दिन म्हणून आज साजरा करण्यात आला. कलामहर्र्षींपासून भालजी, व्ही. शांताराम ते अनंत मानेंपर्यंतच्या पिढीने ‘मराठी चित्रपटसृष्टीची गंगोत्री’ म्हणून असलेले स्थान अबाधित राखले. पण त्यानंतर कोल्हापूरची घसरण सुरू झाली ती अजूनही थांबत नाही. आज कोल्हापुरात संख्यात्मक आणि गुणात्मक पातळीवर किती चित्रपटांची निर्मिती केली जाते याचे अंतर्मुख होऊन परीक्षण करण्याकडे डोळेझाक केली . गेल्या पाच वर्षांत मराठी चित्रपटांना खूप चांगले दिवस आले आहेत असे म्हणताना त्यात कोल्हापूरची निर्मिती असलेल्या किती चित्रपटांचा समावेश आहे याचेही परीक्षण होणे गरजेचे आहे. चित्रपटसृष्टीची परंपरा जपण्यासाठी कोल्हापूरचे चित्रपट व्यावसायिक किती प्रयत्न करताहेत हा वादाचा मुद्दा ठरेल. चित्रनगरी आवश्यक आहेच पण त्याचवेळी एक व्यावसायिक म्हणून या क्षेत्रातले व्यक्ती किती वेगळे प्रयत्न करताहेत यावर प्रकाशझोत टाकला तर हाती निराशाच येईल. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला लागलेले वादाचे ग्रहण सुटेना.
कुठे गेले निर्माते
गेल्या काही दिवसांत ‘बुधिया द वंडर बॉय’ या हिंदी चित्रपटासह ‘लक्ष्य’ मालिका व एक-दोन चित्रपटांचे चित्रीकरण झाले. सतीश रणदिवे दिग्दर्शन करत असलेल्या ‘प्रेमकहाणी’ चित्रपटाचे चित्रीकरणही नुकतेच पूर्ण झाले. देवेंद्र चौगुले यांचा ‘उधळला गुलाल जोतिबाचा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. निर्माते म्हणून देवेंद्र यांच्यानंतर आता कुणाचे नाव घेता येत नाही.
तंत्रज्ञ आणि साईड आर्टिस्ट
मुंबई-पुण्याच्या तुलनेत कोल्हापुरात चित्रपटनिर्मितीचा खर्च कमी येतो शिवाय येथे आऊटडोअर लोकेशन्स खूप चांगले असल्याने अलीकडे येथे चित्रीकरणाचा ओघ बऱ्यापैकी वाढला आहे. त्यामुळे येथील चित्रपट कामगार आणि तंत्रज्ञांना काम मिळते तर कलाकार साईड आर्टिस्ट म्हणून काम करतात. त्यापलीकडे जावून कोल्हापूरकडे पाहिले जात नाही. चित्रपट व्यावसायिकांचा चरितार्थ या सर्वांगाने कोल्हापूरच्या मातीतला उत्कृष्ट सिनेमा आम्ही कधी बनवणार याचा विचार होत नाही.