चित्रपट महामंडळात भ्रष्टाचार नाही
By Admin | Updated: December 6, 2014 00:51 IST2014-12-06T00:50:21+5:302014-12-06T00:51:54+5:30
कार्यकारिणीचे स्पष्टीकरण : निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांचे आरोप

चित्रपट महामंडळात भ्रष्टाचार नाही
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना आम्ही पै न् पै गोळा करून केली आहे. आजवर मंडळाच्या कारभारात एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. केवळ पद मिळाले नाही म्हणून आणि आगामी निवडणूका डोळ््यांसमोर ठेवून या शिखर संस्थेला बदनाम केले जात आहे. आमच्या कार्यकारिणीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असे आव्हान चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर व कार्यवाह सुभाष भुरके यांनी कृती समितीला आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेद्वारे दिले आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीने रविवारी पत्रकार परिषद घेवून चित्रपट महामंडळात मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप केला होता.
या आरोपांचे खंडन करण्यासाठी आज महामंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कृती समितीने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे संचालकांनी सांगितले.
यावेळी अष्टेकर म्हणाले, विजय कोंडकेंना निवडणूकीनंतर अध्यक्षपद मिळाले नाही या सुडापोटी त्यांनी महामंडळाला वेठीला धरले. सुर्वे आणि कोंडके यांच्यातील वाद मिटवण्यासाठी कार्यकारिणीनेच पुढाकार घेतला होता. पण तो कोंडकेंनी मान्य केला नाही. आगामी निवडणुकीसाठीच हे सगळे राजकारण केले जात आहे. मात्र सभासद सुज्ञ आहेत. त्यांना चांगले वाईट कळते.
यावेळी सुरेखा शहा, प्रमोद शिंदे, महेश पन्हाळकर, विजय शिंदे, अनंत काळे, सर्जेराव पाटील, सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर उपस्थित होते.
आता महामंडळ का आठवले ?
दादासाहेब कोंडके असताना विजय कोंडके तीस वर्षे महामंडळाकडे फिरकले नाहीत, शासनाने दिलेली दिलेली सबसिडी रद्द करण्यासाठी या माणसाने आवाज उठवला होता, महामंडळाच्या विरोधात दुसरी संस्था स्थापन केली. आत्ताच या माणसाला चित्रपट महामंडळ का दिसले असा प्रश्न संचालकांनी केला.
उपोषणाला बसतो म्हणाऱ्या महामंडळाच्या माजी कार्यवाह नी आपल्या कारकिर्दीत कार्यालयात काय काय उद्योग केलेत हे मांडायला गेले तर खूप आहे. पण आम्ही पत्रकार परिषद कुणावरही आरोप करण्यासाठी घेतलेली नाही. आमची बदनामी झाली आहेच पण महामंडळाची अधिक बदनामी नको त्यामुळे चर्चेला या आपण सविस्तर बोलू असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
फेर लेखापरीक्षण अहवाल कार्यकारिणीपुढे मांडण्याआधीच अध्यक्षांनी घटनाबाह्य कृत्य करत सभासदांना अहवाल द्यायला लावला. त्यामुळे कार्यकारिणीने हा अहवालच मंजूर किंवा ना मंजूर न केल्याने हिशेबाची पूर्तता करताच येणार नाही.
प्रसाद सुर्वेंनी महामंडळाची रक्कम दिली नव्हती म्हणून त्यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई केली. सुवेर्नी साडे सहा लाख महामंडळाला भरले आहेत , तरिही त्यांच्यावर खटला अजूनही चालू आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली नाही हेच चुकीचे आहे शिवाय मी सुर्वे व संजीव नाईक यांच्याबद्दल कोणतेही प्रतिज्ञा पत्र सादर केलेले नाही, असे सुभाष भूरके म्हणाले,
माझ़्यावर महिलेने केलेला आरोप सिद्धच झालेला नाही त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही, असे अष्टेकर म्हणाले
संस्थेचे संचालक म्हणून आरोप करण्यात आल्याने कोर्टकचेरीचा खर्च संस्थेच्याच नावाने पडणार