पूर्वीच्याच दराने वीज बिले भरून घ्या
By Admin | Updated: December 9, 2014 23:23 IST2014-12-09T21:13:27+5:302014-12-09T23:23:08+5:30
यंत्रमागधारक संघटनांची मागणी : महावितरण कंपनीला दिले निवेदन

पूर्वीच्याच दराने वीज बिले भरून घ्या
इचलकरंजी : राज्य शासनाने वीज दरवाढ रोखण्यासाठी दिलेली अतिरिक्त ७०६ कोटी रुपये अनुदानाची रक्कम रद्द केल्याने यंत्रमाग उद्योजकांच्या वीज दरात असह्य वाढ झाली आहे. शासनाने पूर्ववत अनुदान द्यावे, यासाठी यंत्रमागधारक संघटना जोरदार प्रयत्न करीत आहेत. दरम्यानच्या काळात महावितरण कंपनीने पूर्वीच्याच दराने यंत्रमागांची वीज बिले भरून घ्यावीत, अशा आशयाचे निवेदन यंत्रमागधारक जागृती संघटनेने महावितरण कंपनीचे
कार्यकारी अभियंता आनंदराव शिंदे यांना दिले.
अतिरिक्त वीज अनुदान रद्द केल्याने मागील नोव्हेंबर महिन्याची वीज बिले अधिक रकमेची आली आहेत. त्यामुळे यंत्रमागधारकांमध्ये खळबळ माजल्याने आज, मंगळवारी यंत्रमागधारक जागृती संघटना, एअरजेट विव्हर्स असोसिएशन व रूटी-सी पॉवरलूम संघटनेच्यावतीने महावितरण कंपनीचे अभियंता शिंदे यांना निवेदन दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन म्हणाले, यंत्रमागधारकांना नुकतीच वाढीव दराची वीज बिले मिळाली आहेत. त्यांना भरण्यासाठी १२ डिसेंबर ही तारीख असून, पूर्वीच्याच दराने वीज बिले भरण्यास ताबडतोब मंजुरी मिळावी.
यावेळी ऋषभ जैन, सतीश राठी, अशोक बुगड, कमल तिवारी
यांनीही यंत्रमागधारकांच्यावतीने म्हणणे मांडले. त्यानंतर बोलताना अभियंता आनंदराव शिंदे यांनी, पूर्वीच्याच दराने वीज बिले भरून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंजुरी देऊ, असे सांगितले. (प्रतिनिधी)
संघटना गप्पच..
अचानकपणे वाढीव दराची वीज बिले आल्याने गेले दोन दिवस येथे खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीमध्ये यंत्रमागधारकांचे कैवारी म्हणून कार्यरत असलेल्या इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशन व पॉपलीन यंत्रमागधारक कृती समिती या संघटना अद्यापही मूग गिळून गप्प असल्याबद्दल यंत्रमागधारकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.