‘सनातन’च्या आठवलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: September 27, 2015 00:34 IST2015-09-27T00:33:55+5:302015-09-27T00:34:17+5:30
'जाहीर प्रतिरोध परिषदे'तील ठराव : २६ पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांची परिषदेला उपस्थिती

‘सनातन’च्या आठवलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
कोल्हापूर : हिंंसेचे समर्थन लेखनातून करणारे ‘सनातन प्रभात’चे डॉ़ जयंत आठवले, त्यांचे कार्यकारी मंडळ, नेते आणि सल्लागार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा सरकारने दाखल करावा, सनातन प्रभात आणि त्यांच्या समविचारी संघटनाकडून हिंसक कारवायांसाठी होणारा बहुजनांच्या मुला-मुलींचा वापर रोखावा, हे ठराव जाहीर प्रतिरोध परिषदेत शनिवारी मंजूर करण्यात आले़ या ठरावांना उपस्थित २६ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंजुरी दिली़ गोविंद पानसरे खून तपास प्रकरणात दाखविलेल्या धैर्याबद्दल वकील, पत्रकार आणि पोलीस यांच्या अभिनंदनाचा ठरावही संमत झाला़
कोल्हापूर जिल्ह्यातील पुरोगामी संघटनांनी शाहू स्मारक भवनात ही प्रतिरोध परिषद आयोजित केली होती़ परिषदेचे उद्घाटन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र अध्यक्ष पार्थ पोळके यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले़ पार्थ पोळके म्हणाले, वेदोक्त प्रकरणात राजर्षी शाहूंची बदनामी झाली तेव्हा संपूर्ण कोल्हापूर शाहूंच्या पाठीशी उभे राहिले़ देशातील आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरात गोविंद पानसरेंचा खून झाला, ही बाब गंभीर आहे़ पानसरे, डॉ़ दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्या करण्यापर्यंत मजल जाणाऱ्या धर्मांध शक्ती इतक्या मुजोर का झाल्या आहेत, याचा विचार करण्यासाठी बहुजनांनी आपला इतिहास शोधण्याची गरज आज निर्माण झाली आहे़
राजकीय पोळी भाजण्यासाठीच धर्मांध शक्तींना हिंदुत्वाचा पुळका आहे़ अशा शक्ती पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सरकार आल्यापासून उन्मत्त झाल्या आहेत़ मुख्यमंत्री एकीकडे विकासाची भाषा बोलत असताना पुरोगामी विचारवंतांचे खून केले जात आहेत़ मात्र, याबाबत ते बोलण्यास तयार नाहीत, यामागचे इंगित आपण समजून घेतले पाहिजे़
या परिषदेत अॅड़ पंडित सडोलीकर, डॉ़ ज़ रा़ दाभोळे, डॉ़ विजय काळेबाग, नंदकुमार गोंधळी, लालासाहेब नाईक, डॉ़ सुनील पाटील, मच्छिंद्र कांबळे, अनंत मांडुकलीकर, सखाराम कामत, चंद्रकांत पाटील, अस्मिता दिघे, आदींची भाषणे झाली़
डॉ़ सुनील कांबळे यांनी स्वागत केले़ डॉ़ सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर अनिल म्हमाने यांनी सूत्रसंचालन केले़ (प्रतिनिधी)