चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफांवर गुन्हे दाखल करा
By Admin | Updated: December 2, 2014 00:15 IST2014-12-01T23:50:31+5:302014-12-02T00:15:03+5:30
शिवसेनेचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटणार

चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफांवर गुन्हे दाखल करा
कोल्हापूर : दरोडा, घरफोडी, चेन स्नॅचिंगमध्ये चोरी केलेले सोने जिल्ह्यातील काही सराफ विकत घेऊन कोट्यवधी रुपये कमवित असताना पोलीस मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत. गुन्हेगारांशी लागेबांधे असणाऱ्या सराफांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे शिष्टमंडळासह उद्या, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.
जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, चेन स्नॅचिंगसारख्या गंभीर घटना घडत आहेत. दरोडेखोर चोरी केलेले सोने जिल्ह्णातीलच सराफाला विकून त्यामधून पैसे कमवित आहेत. पोलीस मात्र चोरट्यांच्या शोधासाठी वेळ, पैसा खर्च करीत आहे. सराफ चोरट्यांकडून कमी भावात सोने खरेदी करून तो मार्केटमध्ये बाजारभावाप्रमाणे विकून कोट्यवधी रुपये कमवित आहे. अनेक सराफांचे चोरट्यांशी लागेबांधे असून, त्यांची ही एक साखळीच आहे. चोरट्यांवर गुन्हे दाखल होतात. पण सराफावर मात्र गुन्हे दाखल करण्यात पोलीस कुचराई करतात. चोरीचे दागिने विकत घेणे हा देखील गुन्हाच असताना त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही. पोलिसांनी दरोडेखोरांपाठोपाठ चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख पवार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)