वाळवे खुर्द, सोनाळीमध्ये मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:20+5:302021-01-17T04:22:20+5:30
मुरगूड :- ग्रामपंचायत निवडणुकीनंतर कागल तालुक्यातील वाळवे खुर्द आणि सोनाळी या गावांमध्ये जोरदार मारामारी झाली. वाळवेमध्ये मोठा जमाव जमला ...

वाळवे खुर्द, सोनाळीमध्ये मारामारी
मुरगूड :- ग्रामपंचायत निवडणुकीनंतर कागल तालुक्यातील वाळवे खुर्द आणि सोनाळी या गावांमध्ये जोरदार मारामारी झाली. वाळवेमध्ये मोठा जमाव जमला होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मारामारीप्रकरणी मुरगूड पोलिसांनी वाळवे खुर्दमधील सहाजण, तर सोनाळीमधील चारजणांवर गुन्हा नोंद केला आहे.
वाळवे खुर्दमध्ये मतदान झाल्यानंतर मराठी शाळेच्या बाहेर जमाव जमला होता. या ठिकाणी परस्परविरोधी गटातील कार्यकर्ते होते. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला; पण जमावाने एकमेकास शिवीगाळ केली. त्यातून धक्काबुक्की झाली. घटनास्थळी मुरगूडचे सपोनि विकास बडवे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी जमाव पांगवला. शनिवारी पहाटेपर्यंत गावात पोलीस बंदोबस्त होता.
पोलीस कर्मचारी रमेश शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाळवे खुर्दमधील अमृत सुभाष पाटील, अजिंक्य संभाजी हासबे, अमर संजय कावरे, सचिन हिंदुराव खोराटे, पंकज मारुती पाटील, गजेंद्र एकनाथ शेणवी या सहाजणांवर गुन्हा नोंद केला. आज दिवसभर आणखी दहा ते पंधराजणांवर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
सोनाळी (ता कागल) येथे मतदान संपल्यानंतर गावातील मारुती मंदिराजवळ उभा असणाऱ्या विनायक रघुनाथ भोसले या तरुणाला तू मतदान कोणास केले, असा जाब विचारण्यासाठी चार तरुण गेले. यावेळी या चौघा तरुण व विनायक यांच्यात बाचाबाची झाली. त्यातून त्या चौघांनी विनायक भोसले यास लाथा-बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण करून जखमी केले. भोसले यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आदेश अनिल पाटील, अनिल संभाजी पाटील, नामदेव महादेव पाटील व योगेश सुनील पाटील या चौघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास सहा पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे करत आहेत.