लढाऊ एन. डी. सरांनी ९२ व्या वर्षी कोरोनालाही हरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:55+5:302021-05-17T04:22:55+5:30
दहा दिवसांच्या जीवघेण्या उपचारानंतर रविवारी सुखरूप घरी लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ज्येष्ठ लढाऊ नेते प्रा. एन. डी. पाटील ...

लढाऊ एन. डी. सरांनी ९२ व्या वर्षी कोरोनालाही हरवले
दहा दिवसांच्या जीवघेण्या उपचारानंतर रविवारी सुखरूप घरी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ज्येष्ठ लढाऊ नेते प्रा. एन. डी. पाटील नावाचे ९२ वयाचे काय अजब रसायन आहे, याची प्रचिती कोरोनानेदेखील घेतली. त्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीसमोर कोरोनानेदेखील हार मानली आणि दहा दिवसांच्या यशस्वी उपचारांनंतर सर रविवारी दुपारी सुखरूप घरी परतले.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे सध्या वयोमानापरत्वे आलेल्या आजारपणामुळे रुईकर कॉलनीतील घरीच उपचार घेत आहेत. शरीर साथ देत नसले तरी मन अजूनही खंबीर आहे. त्यामुळेच गेली दीड वर्षे कुठेही गेलेले नाहीत. गतवर्षी ९ मे रोजी ते कर्मवीर अण्णांच्या पुण्यतिथीला सातारला गेले होते. उपचारांनाही ते हसत मुखाने सामोरे जात आहेत. त्यांना विस्मरणाचा विकार आहे. त्यामुळे सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू झाल्यावर एन. डी. सरांना त्यापासून लांब ठेवण्याची पूर्ण दक्षता त्यांच्या पत्नी सरोज उर्फ माईंनी घेतली. त्यांच्यापर्यंत बाहेरचे कोणी थेट पोहोचणार नाही, याचीही संपूर्ण काळजी घेतली होती. रोजच्या भेटीगाठीही बंद करण्यात आल्या होत्या. त्यांच्या सेवेसाठी विशेष ब्रदरही नियुक्त करण्यात आले होते. त्यातील एकाच्या गाफीलपणामुळे सरांना संसर्ग झाला.
कुटुंबातील नऊजणांच्या चाचण्या करण्यात आल्या. पण अन्य कुणालाही हा संसर्ग झाला नाही. साधारण धाप आणि खोकला लागल्यानंतर अँटिजन चाचणी करण्यात आली, ती निगेटिव्ह आली. त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली, त्यात ते पॉझिटिव्ह आले. यानंतर त्यांना तातडीने ॲपल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतापराव पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना तपासणी अहवाल पाठवले. त्यांनी मुंबईतील तज्ज्ञांना दाखवून उपचाराची दिशा निश्चित केली. ॲपलमधील डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर तातडीने उपचार केले. त्यांनी नेहमीप्रमाणे उपचारालाही उत्तम प्रतिसाद दिला. दहा दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परत आले.
चौकट
सारे घर गलबलले...
एन. डी. सर दवाखान्यात असताना पत्नी माई यांनाही भेटू दिले नाही. कारण त्यांचेही वय ८२ आहे. त्यामुळे धोका नको म्हणून ही दक्षता बाळगली गेली. म्हणून सरांचा व्हिडीओ करून डॉक्टर पाठवत असत. पण सर रोज सरोज कुठे आहे, म्हणून भंडावून सोडत. रविवारी सर घरी आल्यावर माई त्यांच्यासमोर जाऊन उभ्या राहिल्या. सरांनी त्यांचा हात घट्ट पकडून ठेवला, ते पाहून काहीक्षण मुलगा सुहास यांच्यासह सारेच गलबलून गेले.
लढाऊ बाणा
गोरगरीब श्रमिकांसाठी कायम रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या एन. डी. यांचा लढाऊ बाणा कोरोनानेही पहिला. तरुण पिढी कोरोनासमोर हात टेकत असतानाही एन. डी. सर त्याला हरवू शकले कारण त्यांची मूळ शरीरयष्टी उत्तम आहे. उभ्या आयुष्यात कायम कष्टाचे जीवन ते जगले आहेत. उत्तम आहार आणि समाधानी वृत्ती राहिली आहे. आजही ते रोज सकाळी अर्धा लीटर आणि रात्री अर्धा लीटर दूध पितात आणि ते पचवतात.
आज लग्नाचा हिरक महोत्सव
सर आणि माई यांच्या लग्नाला आज (सोमवारी) १७ मे रोजी ६१ वर्षे होत आहेत. या उभयतांनी कधीच वाढदिवस साजरा केला नाही. पण ते आजारातून बरे होऊन घरी आले आणि लग्नाचा वाढदिवस असा योगायोग जुळून आला आहे.
या काळात जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, ॲपल हॉस्पिटलच्या गीता आवटे आणि सर्व स्टाफ यांची खूप मोलाची मदत झाल्याच्या भावना सरोज पाटील यांनी व्यक्त केल्या.
आतापर्यंत एन. डी. सरांची पायाची, गुडघ्याची, हृदय शस्त्रक्रिया (सात ब्लॉक होते) झाली आहे. २००९ला त्यांची कॅन्सरमुळे एक किडनी काढली आहे पण तरीही हा माणूस लोकांच्या प्रश्नावर कायम लढत आला आहे.
चौकट
आणि जीव भांड्यात पडला
एन. डी. सरांना कोरोना झाला आहे म्हटल्यावर अनेकांचा जीव कासावीस झाला होता. प्रत्येकजण त्यांच्या घरी फोन करून ख्याली खुशाली जाणून घेत होता. त्यांची प्रकृती चांगली आहे, उपचाराला प्रतिसाद देत आहेत, हे ऐकून मनाला बरे वाटत होते. रविवारी दुपारी दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन परतल्याची वार्ता ऐकून कासावीस झालेला जीव भांड्यात पडला.