शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार
By Admin | Updated: October 17, 2014 22:51 IST2014-10-17T22:33:29+5:302014-10-17T22:51:07+5:30
एन. डी. पाटील : टोलविरोधी कृती समिती आज महापालिका, पोलीस अधीक्षकांना भेटणार

शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार
कोल्हापूर : टोलप्रश्नी न्यायालयात मुद्दाम वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी कोल्हापूूरकरांची बाजू कुमकवत केली, असा संशय आज, शुक्रवारी येथील विठ्ठलमंदिरात झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. याप्रश्नी जाब विचारण्यासाठी उद्या, शनिवारी महापालिकेवर धडक मारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, न्यायालयाचा निवाडा काहीही असो; जनतेच्या बरोबरीने शेवटच्या श्वासापर्यंत टोलचा लढा सुरू ठेवणार, असा निर्धार ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी यावेळी केला.
उच्च न्यायालयाने टोलला आव्हान देणाऱ्या तीनही याचिका फेटाळल्यानंतर टोलविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कृती समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या. दिवाळीतही विविध मार्गांनी आंदोलन करून टोलविरोध कायम ठेवण्याचा निर्धार केला. प्रा. पाटील म्हणाले, यापुढे कोणाचीही गय न करता जाब विचारण्याची वेळ आली आहे. ‘आयआरबी’ला दिलेल्या जागेवरील बांधकामाबाबत महापालिकेने निर्णय घेतला नाही. टोल वसुलीच्या कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी व पोलिसांची जबाबदारी याबाबत पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेऊ. यावेळी रामभाऊ चव्हाण, अशोक पोवार, बाबा पार्टे, लाला गायकवाड, किशोर घाटगे, दीपाताई पाटील, वैशाली महाडिक, बजरंग शेलार, भगवान काटे, आदी उपस्थित होते.
कोण, काय म्हणाले....
प्रा. एन. डी. पाटील : चारचाकी मालकांचा प्रतिसाद नाही; तरीही रस्त्यावरील माणसाच्या जोरावर आंदोलन सुरू ठेवू.
महापौर तृप्ती माळवी : कोणत्याही परिस्थितीत टोल देऊ नका. पर्यायी रस्त्यांपेक्षा ताठ मानेने मुख्य रस्त्यावरून टोल न भरता या.
अॅड. बाबा इंदुलकर : महापालिकेने रस्त्यांचा पंचनामा दिल्यानंतर ‘आयआरबी’वर फौजदारी दाखल करता येईल.
अॅड. विवेक घाटगे : वकिलांची फौज कोल्हापूरकरांच्या मागे आहे. टोल न देणे हा गुन्हा नाही.
कॉ. चंद्रकांत यादव : नाक्यांवरील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र व त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती घेणे गरजेचे आहे.
दिलीप देसाई : ‘एमएसआरडीसी’ला ताराराणी विश्रामगृह विकसित करू न देता त्याठिकाणी वसतिगृहाची मागणी करू.
आजचे नियोजन
शनिवारी (दि. १८) महापालिकेत सकाळी ११ वाजता शहर अभियंत्यांना जाब विचारणार. त्यानंतर १२ वाजता पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना भेटणार.
यंदाच्या दिवाळीत ‘टोल देणार नाही’ अशी रांगोळी शहरवासीयांनी काढाव्यात. नागरिकांनी अशा रांगोळी काढाव्यात यासाठी प्रभागवार कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेण्याचे बैठकीत ठरले.