कपिलतीर्थ मार्केटच्या ‘बीओटी’ विरोधात लढा
By Admin | Updated: November 23, 2014 23:53 IST2014-11-23T22:51:04+5:302014-11-23T23:53:34+5:30
आयुक्तांना भेटणार : पुनर्वसनाची विक्रेत्यांची मागणी

कपिलतीर्थ मार्केटच्या ‘बीओटी’ विरोधात लढा
कोल्हापूर : महाद्वार रोडनजीक असलेली कपिलतीर्थ भाजी मंडई ‘बीओटी’वर (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) विकासित करण्यात येणार असून त्यामुळे पाचशेहून अधिक भाजीविक्रेत्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. विकास जरूर करा परंतु आमच्या पुनर्वसनाचे काय? असा सवाल येथील भाजी विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे. प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी उद्या, सोमवारी दुपारी चार आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदन देणार असल्याची माहिती भाजी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष विलास मेढे यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील बीओटी प्रकल्पाचा अनुभव वाईट आहे. ‘मार्केट’च्या विकासाच्या नावाखाली येथील भाजी विक्रेत्यांना विस्थापित केले जाणार आहे. कपिलतीर्थ मार्केट ‘बीओटी’ विरोधात तीव्र आंदोलन करण्याची गरज पडल्यास शहरातील सर्व विक्रेते मिळून हे आंदोलन करतील, प्रकल्प राबविण्यापूर्वी भाजी विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचे काय, या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी व प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आयुक्तांना निवेदन देणार असल्याची माहिती मेढे यांनी दिली.
सागर पोवार, विलास निकम, संदीप पोवार, प्रदीप इंगवले, रवींद्र आंबेकर, पिंटू जाधव, मनोज जाधव आदींसह भाजीविक्रेते उपस्थित होते.
काय आहे प्रकल्प
महाद्वार रोड या शहरातील सर्वांत महागड्या परिसरात असलेल्या कपिलतीर्थ मार्केटचा विकास ‘बीओटी’वर करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. संपूर्ण भाजीमंडईच्या जागेवर तीन मजली इमारत होणार असून १५० भाजी विक्रेत्यांना बसण्याची जागा, पार्किंग, अन्नछत्र, बॅडमिंटन हॉलसह व्यापारी गाळे काढण्याची ही योजना आहे. २० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या या प्रकल्पाची निविदा महिन्याभरात काढली जाणार आहे.