संकेश्वरजवळ भीषण अपघात; नऊजण ठार
By Admin | Updated: October 18, 2015 01:20 IST2015-10-18T01:10:58+5:302015-10-18T01:20:42+5:30
मृत चिक्कोडी तालुक्यातील : भाविकांच्या ट्रॅक्सला ट्रकची धडक

संकेश्वरजवळ भीषण अपघात; नऊजण ठार
संकेश्वर : जोतिबा देवदर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांच्या ट्रॅक्सला मालवाहू ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात नऊजण ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगलोर महामार्गावर संकेश्वरजवळ म्हसोबा हिटणी फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. मृत व जखमी अंकली (ता. चिकोडी) येथील आहेत.
मृतात शंकर इराप्पा कुंभार (वय ४५), पापू शिवलिंग कुंभार (६२), महादेव बाळगौंडा पाटील (६०), ज्योती रामगौंडा पाटील (६६), रमेश आप्पासोा पाटील (३८), सोमनाथ कल्लाप्पा बडिगेर (३७), कृष्णा परशराम मोरे (३५), केदारी आप्पासाहेब पाटील (४०) यांचा समावेश आहे. एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींमध्ये राजू हजारे, सुभाष पाटील, प्रवीण पाटील, बाळगौंडा मलगौंडा पाटील (६०, सर्व रा. अंकली), ट्रॅक्सचालक बाळकू चोकावी (रा. सिद्धापूरवाडी, ता. चिकोडी) यांचा समावेश आहे.
अंकली (ता. चिकोडी) येथील चौदा जोतिबा भक्त भाड्याच्या ट्रॅक्स (केए २३ एम ८६४६) मधून जोतिबाच्या दर्शनाला गेले होते. घरी परतताना म्हसोबा हिटणी फाट्याजवळ संकेश्वरकडे जाण्यास ट्रॅक्स वळत होती. याचवेळी भरधाव वेगाने मालवाहू ट्रक (टीएन ५२ - ४९५५) हा निपाणीहून संकेश्वरकडे जात होता. या ट्रकने भाविकांच्या ट्रॅक्सला जोरदार धडक दिली. ट्रॅक्स रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या सरकारी रुग्णवाहिकेवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात आठ पुरुष आणि एक महिला जागीच ठार झाले व अन्य पाचजण जखमी झाले आहेत. जखमींवर बेळगावच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मदत देणार : हुक्केरी
रात्री नऊच्या सुमारास संकेश्वर येथे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी भेट घेऊन मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी फोनवर संपर्क साधून सरकारतर्फे प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाइकास दोन लाख रुपये मदत देणार असल्याचे सांगितले.