जिल्हा बँकेसाठी इच्छुकांची फिल्डिंग
By Admin | Updated: February 20, 2015 23:11 IST2015-02-20T22:00:08+5:302015-02-20T23:11:48+5:30
गडहिंग्लज तालुका : उमेदवारीसाठी ‘राष्ट्रवादी’त रस्सीखेच

जिल्हा बँकेसाठी इच्छुकांची फिल्डिंग
राम मगदूम - गडहिंग्लज -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तालुक्यातील एकूण १०७ सेवा संस्था बँकेच्या मतदार आहेत. त्यापैकी अधिकाधिक ठराव मिळविण्यासाठी इच्छुकांत चढाओढ झाली असली तरी ‘राष्ट्रवादी’मध्येच उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच आहे.गेल्यावेळी राष्ट्रवादीतर्फे सेवा संस्था गटातून टी. आर. पाटील व दूध संस्था गटातून भैयासाहेब कुपेकर यांना, तर महिला प्रतिनिधी म्हणून ऊर्मिलादेवी शिंदे यांना सत्ताधारी आघाडीतून संधी मिळाली होती.थकीत कर्ज वसुलीच्या कारणावरून विद्यमान संचालकांवर निवडणूक लढविण्यासाठी अपात्रतेच्या गंडांतराचे संकट आले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी यावेळी त्यांच्या वारसांची नावे चर्चेत आहेत. ठरावांच्या जमवाजमवीवरून त्यास पुष्टी मिळाली आहे.गडहिंग्लज तालुक्यातील बहुतांशी सेवा संस्थांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्यामुळे ठराव गोळा करण्यात राष्ट्रवादीनेच बाजी मारली आहे. मात्र, इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे उमेदवार देताना पक्षनेतृत्वाची कसोटी लागणार आहे.याशिवाय अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर, श्रीपतराव शिंदे, प्रकाश चव्हाण, प्रकाश शहापूरकर व सदानंद हत्तरकी यांच्या गटातर्फेही ठराव गोळा करण्याची ‘विशेष’ मोहीम राबविण्यात आली आहे. तथापि, बँकेच्या निवडणुकीत जिल्हा पातळीवरील आघाड्या व पॅनेलची रचना कशी होणार? यावरच उमेदवारीची संधी कुणाला मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.स्व. कुपेकर यांच्या जिल्ह्याच्या राजकारणातील दबदब्यामुळे यापूर्वी राष्ट्रवादीला तालुक्यात दोन जागा मिळत होत्या. आघाडीतील मित्रपक्ष म्हणून जनता दलाचे नेते अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या पत्नी ऊर्मिलादेवी यांनाही दोनवेळा संचालकपदाची संधी मिळाली. कुपेकरांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत गडहिंग्लजसह जिल्ह्याच्या राजकारणाचेही संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे तालुक्याला किती जागा मिळणार? यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
राष्ट्रवादीतर्फे विद्यमान संचालक टी. आर. पाटील यांचे सुपुत्र संतोष पाटील-कडलगेकर, सतीश पाटील-गिजवणेकर, राजेश पाटील-औरनाळकर, जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली व जयकुमार मुन्नोळी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, उमेदवारीचा अंतिम निर्णय संध्यादेवी कुपेकर यांच्यावरच अवलंबून आहे.
स्व. बाबासाहेब कुपेकर यांचे बंधू भैयासाहेब कुपेकर यांना गेल्यावेळी दूध संस्था गटातून उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यांचे सुपुत्र संग्रामसिंह कुपेकरांनी विधानसभा निवडणुकीत संध्यादेवींच्या विरोधात बंडखोरी केली. त्यामुळे दूध संस्था गटाची उमेदवारी अन्य तालुक्याला गेल्यास गडहिंग्लजला मिळणाऱ्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच होईल.
यावेळी बँकेच्या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीचे संदर्भ असणार आहेत. त्यामुळे अप्पी पाटील व संग्रामसिंह कुपेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.