‘पोलीस लाइन’मध्ये उमेदवारीसाठी फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:25 IST2021-01-25T04:25:33+5:302021-01-25T04:25:33+5:30
पोलीस लाइन (सर्वसाधारण) रमेश पाटील कसबा बावडा : धैर्यप्रसाद चौक. ॲपल हॉस्पिटल ते लाइन बझारमधील छावा चौक असा ...

‘पोलीस लाइन’मध्ये उमेदवारीसाठी फिल्डिंग
पोलीस लाइन
(सर्वसाधारण)
रमेश पाटील
कसबा बावडा :
धैर्यप्रसाद चौक. ॲपल हॉस्पिटल ते लाइन बझारमधील छावा चौक असा विस्ताराने सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला व मध्यमवर्गीय नोकरदार आणि उच्चभ्रू वस्ती असा संमिश्र परिसर असणाऱ्या प्रभाग क्रमांक ६ ‘पोलीस लाइन’ या प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच नेत्यांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्याने या प्रभागातून महापालिका गाठण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. अनेक इच्छुकांनी आतापासूनच मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केल्याने या प्रभागातून उमेदवारी देताना नेत्यांची मोठी कसरत होणार आहे. या प्रभागात काँग्रेसकडून म्हणजेच पालकमंत्री सतेज पाटील गटाकडून सर्वाधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. या प्रभागात काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत रंगणार आहे. मागील निवडणुकीत या प्रभागाचे नेतृत्व स्वाती येवलुजे यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी ताराराणीच्या उमेदवार संगीता बिरांजे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. यवलुजे यांना महापौरपदाची संधीही मिळाली होती. आता हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्याने त्यांचे पती सागर येवलुजे या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे.
सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा पॅटर्नचे जनक, भारत गीता गॅस एजन्सीमालक, मॅंगो पल्प प्रकल्प तसेच हॉटेल व फौड्री अशा विविध उद्योगात दबदबा निर्माण केलेले उच्चशिक्षित शिक्षक, उद्योजक विनायक कृष्णराव कारंडे हेही या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे.
गव्हर्न्मेंट सर्व्हंट बँकेचे गेली सतरा वर्षे संचालक व दोन वर्षे अध्यक्षपद भूषविलेले माजी नगरसेवक चंद्रकांत घाडगे ही या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. ते भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा भरवणारे व मंडप व्यावसायिक असलेले निवास जाधव, माजी स्थायी समिती सभापती कै. सदाशिव येवलुजे यांचे चिरंजीव समीर यवलुजे, कसबा बावडा व्यापारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक दिलीप नाटेकर, धीरज पाटील हे महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. या प्रभागात काँग्रेसविरुद्ध भाजप अशी जरी लढत होणार असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी यांचेही उमेदवार रिंगणात असणार आहेत.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते : १) स्वाती येवलुजे (काँग्रेस) १७१७ (विजयी ),
२) संगीता बिरांजे ( ताराराणी) ८०७, ३) शकुंतला माने (शिवसेना) ३६१, ४) प्राजक्ता लाड (राष्ट्रवादी ) ७५
भागातील सुटलेले नागरी प्रश्न...
भागातील ८० टक्के रस्ते, गटारींची कामे झालेली आहेत. प्रभाग एलइडी दिव्यांनी उजळला आहे. प्रभागात पिण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. पद्मा पथकची इमारत नवीन बांधण्यात आली आहे. हॉकी ग्राउण्डची दुरुस्ती करण्यात आली आहे. शिवतेज नवीन मंडळाच्या इमारतीचे काम सुरू आहे. झूम प्रकल्पाभोवती कंपाउण्ड वॉल बांधण्यात आली आहे. तसेच येथे प्रक्रिया करण्याची मशनरी कार्यान्वित आहे.
कोट : प्रभागात लाइन बझारची अस्मिता असलेल्या पद्मा पथकाची नवीन ४० लाख खर्चून इमारत बांधली आहे. हॉकी ग्राउण्डचीही २७ लाख रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली आहे. प्रभागात तीन ठिकाणी हाय मास्क बसविण्यात आले आहेत. बहुतेक ठिकाणचे रस्ते, गटारीची कामे पूर्ण आहेत. झूम प्रकल्पासाठी ही २० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शिवतेज तरुण मंडळाचे इमारतीचे काम सुरू आहे. एकंदरीत प्रभागात २८ कोटीची कामे करण्यात आली आहेत.
स्वाती येवलुजे
नगरसेविका
भागातील शिल्लक नागरी प्रश्न : प्रभागातील जाधव व्यायामशाळा ते अष्टेकर नगर चॅनलचे काम अपूर्ण आहे. या नाल्यातून शेतीशाळा व अन्य ठिकाणचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असते. पावसाळ्यात त्या नाल्याला फुग येतो व ते पाणी आजूबाजूला पसरते. शिवाय या ठिकाणी दलदल आणि झुडपे आहेत. त्यामुळे या ठिकाणी चॅनल बांधणे आवश्यक आहे. सध्या या चॅनलचे काम निधीअभावी अर्धवट आहे. तसेच प्रभागात असलेल्या झूमचा वास, धूर, डास यांचा होणारा त्रास कमी व्हावा, अशी लोकांची मागणी आहे.
फोटो: २४ प्रभाग क्रमांक ६
प्रभागातील जाधव व्यायामशाळा ते अष्टेकरनगर चॅनलचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे.