गवे शेतात....अधिकारी कार्यालयात
By Admin | Updated: November 9, 2014 23:30 IST2014-11-09T23:19:52+5:302014-11-09T23:30:59+5:30
पन्हाळा तालुका : पिकांचे नुकसान; अनेक उपाययोजना कुचकामी

गवे शेतात....अधिकारी कार्यालयात
राम करले - बाजारभोगाव -पन्हाळा तालुक्यातील शेती व्यवसाय गव्यांमुळे धोक्यात आला आहे. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही कवडीमोल भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा महाप्रताप वनखात्याने सुरू केला आहे. दिवसाढवळ्या शेतात येऊन नुकसान करणाऱ्या रेड्यांना आवरणार कोण? हा खरा प्रश्न आहे. परिणामी ‘गवे शेतात, वनखात्याचे अधिकारी कार्यालयात’ असा दुर्दैवी अनुभव शेतकऱ्यांना येऊ लागला आहे.
पन्हाळा पश्चिम भागातील किसरूळ, काळजवडे, मानवाड, पाटपन्हाळा, वाशी, पडसाळी, मुगडेवाडी, बांद्रेवाडी, पोर्ले, बोरगाव, पोहाळवाडी, कळे, वाळकेवाडी, आतकिरवाडी, सुळे, पणोरे, आदी गाव परिसरात गव्यांनी शेतीपिकांमध्ये उच्छाद मांडला आहे. शेतात घुसलेले गवे हुसकावून लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. फटाके वाजवणे, कुत्री गव्यांच्या अंगावर सोडणे हे प्रकार गव्यांच्या सवयीचे झाले आहेत. त्यामुळे त्यांना हुसकावून लावण्यासाठी काय करायचे, हा प्रश्न आहे.
शेतपिकांची गव्यांपासून राखण करण्यासाठी रात्रभर जागे राहण्याची वेळ बळिराजावर आली आहे. काबाडकष्ट करून रात्रीची झोप आवश्यक असताना जागरण होते. त्यामुळे शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळत आहे.
गव्यांपासून संरक्षणासाठी वनखात्याकडून कडक उपाययोजना आखल्या जात नाहीत. ‘गव्यांना आवरा, आमचा संसार सावरा’ अशी आर्त हाक अधिकाऱ्यांच्या कानी पडत नाही. शेतात शिरलेल्या गव्यांना हुसकावून लावण्यासाठी खात्याचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. गव्यांच्या बंदोबस्तासाठी काही ठिकाणी जंगलाभोवती चरीची कामे करण्यात आली आहेत. मात्र, शासनाच्या मार्गदर्शन तत्त्वाला तिलांजली देत अधिकाऱ्यांनी काही लाख रुपयांचा खर्च चरींमध्ये मुरविल्याची चर्चा आहे. त्यामुळे असून अडचण, नसून खोळंबा, अशी अवस्था चरींच्या कामाची झाली आहे.
शेतात राखणीला गेलेल्या शेतकऱ्यांवर गव्यांकडून हल्ला झाल्याने मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. लक्ष्मण खोत - काऊरवाडी, दादू मोरे - मोताईवाडी या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक
शेतकरी जखमी झाले असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना दोन लाख रुपये, तर मृतांना पाच लाख रुपये द्यावेत. मृत शेतकऱ्याच्या वारसांना खात्याच्या सेवेत सामील करून घ्यावे. जंगलाच्या भोवती सौरऊर्जेचे कुंपन घालावे. गव्यांना आवश्यक गरजा जंगल परिसरात उपलब्ध कराव्यात. जंगलापेक्षा परिसरात भटकणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे.
- रामचंद्र बाबू कर्ले,
अध्यक्ष, संयुक्त वन समिती, पिसात्री.