थोडगे मारहाणीचा चौकशी अहवाल गायब

By Admin | Updated: August 13, 2014 00:35 IST2014-08-13T00:30:40+5:302014-08-13T00:35:42+5:30

अहवाल दिला : चौकशी अधिकारी गवळी : अद्याप मिळाला नाही; पोलीस अधीक्षक शर्मा अहवाल दिला : चौकशी अधिकारी गवळी : अद्याप मिळाला नाही; पोलीस अधीक्षक शर्मा

A few more mortal inquiry reports are missing | थोडगे मारहाणीचा चौकशी अहवाल गायब

थोडगे मारहाणीचा चौकशी अहवाल गायब

एकनाथ पाटील - कोल्हापूर -- गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे मारहाण प्रकरणाचा चौकशी अहवालच गायब झाला आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवून दहा दिवस उलटले असले तरी आपल्यासमोर आतापर्यंत अहवाल प्राप्त झालेलाच नाही, असे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमका अहवाल गेला कुठे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
थोडगे हे १५ जुलैला नातेवाइकांच्या तक्रारीसंदर्भात करवीर पोलीस ठाण्याच्या आवारात आले असता एका कॉन्स्टेबलने त्यांना अरेरावी केली. त्याबाबत त्यांनी जाब विचारला असता चार ते पाच कॉन्स्टेबलनी त्यांना बेदम मारहाण केली. आपल्याला विनाकारण मारहाण झाली म्हणून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय थोडगे यांनी घेतला. हा प्रकार समजताच आमदार चंद्रदीप नरके घटनास्थळी आले. त्यावेळी पोलिसांनी क्षमायाचना केली. त्यानंतर सामाजिक संस्थांनी हे प्रकरण लावून धरले. थोडगे यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे याप्रकरणी चौकशीची मागणी केली. त्यानुसार त्यांनी १६ जुलैला चौकशी अधिकारी म्हणून किसन गवळी यांची नियुक्ती केली. गवळी यांनी या संपूर्ण प्रकरणाची दहा दिवसांत गोपनीय चौकशी केली. त्यामध्ये ठाणे अंमलदार, मदतनीस, पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले अन्य कर्मचारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी, थोडगे यांचे जाब-जबाब घेतले. दरम्यान, सुमारे साठ पानी गोपनीय चौकशी अहवाल शनिवारी,  २ आॅगस्टला पोलीस अधीक्षकांच्या नावे आवक-जावक (टपाल) विभागाकडे सादर केल्याची माहिती चौकशी अधिकारी किसन गवळी यांनी दिली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा दोन दिवस प्रशासकीय कामकाजानिमित्त मुंबईला गेले. ते परत आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी थोडगे मारहाणीचा अहवाल आपल्याकडे आलाच नसल्याचे सांगितले.  याप्रकरणी त्यांच्याकडे तीनवेळा चौकशी केली असता त्यांनी तेच उत्तर दिले. प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले त्या अप्पर पोलीस अधीक्षक गोयल यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीही आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगून हात वर केले. तपास अधिकारी गवळी मात्र आपण अहवाल सादर केल्याचे सांगत आहेत. त्यामुळे थोडगे अहवाल गेला कुठे? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न...
आवक-जावक (टपाल) विभाग हा पोलीस मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावर आहे. दुसऱ्या मजल्यावर पोलीस अधीक्षकांचा कक्ष आहे. दहा दिवस होऊनही येथून अहवाल पुढे सरकला की नाही याबाबत कोणी विचारणाही केलेली दिसत नाही. त्यामुळे टपाल विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणात करवीर पोलीस ठाण्यातील कर्मचारी दोषी असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: A few more mortal inquiry reports are missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.